हेस्कॉमच्या हुबळी येथील कार्यालयाचे स्पष्टीकरण
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने राज्यात 1 एप्रिलपासून नवीन वीजदरवाढ लागू करता आली नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्याची वाढीव दरवाढ जून महिन्याच्या बिलामध्ये देण्यात आली आहे. याचबरोबर वीजखरेदी महागल्याने त्याचा वाढीव बोजा बिलामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने जून महिन्यात वीजबिल अधिक आल्याचे ग्राहकांना वाटत आहे. परंतु, कर्नाटक विद्युत नियामक मंडळाने (केईआरसी) घालून दिलेल्या नियमावलीनुसारच वीजबिले देण्यात आल्याचे स्पष्टीकरण हेस्कॉमच्या हुबळी येथील कार्यालयाने दिले आहे. जून महिन्यात हेस्कॉमकडून देण्यात आलेल्या वीजबिलात 50 ते 60 टक्के दरवाढ झाल्याचे दिसून आले. वीजबिलामध्ये फ्युअल अॅडजेस्टमेंट कॉस्ट (एफएसी) दरात वाढ केल्याने वीजबिल भरमसाट आले. घरगुती ग्राहकांबरोबरच लघुउद्योजक, मोठे उद्योग, व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसला. त्यामुळे हेस्कॉमविरोधात संतापाची लाट पसरली गेली. काहींनी हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालकांसमोर नाराजी व्यक्त केली. वाढीव वीजबिल मागे घेण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. भरमसाट वीजबिलाविरोधात नागरिकांची आंदोलने वाढल्याने अखेर हेस्कॉमला स्पष्टीकरण द्यावे लागले. केईआरसीकडून दरवर्षी 1 एप्रिलपासून नवीन वीजदर लागू केले जातात. यावर्षीही रितसरपणे वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन हेस्कॉमने दरवाढ होणार असल्याचे जाहीर केले होते. यादरम्यान विधानसभा निवडणुका लागल्याने दरवाढ तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. 12 मे 2023 ला केईआरसीने परवानगी दिल्यानंतर दरवाढ करण्यात आली. याचा परिणाम जून महिन्यात आलेल्या वीजबिलावर झाला. पुढील महिन्यापासून इतकी भरमसाट बिले येणार नसल्याचे स्पष्टीकरण हेस्कॉमकडून देण्यात आले आहे.
‘गृहज्योती’साठी आवाहन
नव्या राज्य सरकारने पाच गॅरंटी योजना जाहीर केल्या होत्या. त्यापैकी एक असलेल्या गृहज्योती योजनेला जुलै महिन्यापासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्ट 2023 पासून येणाऱ्या वीजबिलामध्ये 200 युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. यासाठी सप्टेंबर 2023 पर्यंत ग्राहकांनी जुनी बिलबाकी भरणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.
बिल भरून हेस्कॉमला सहकार्य करण्याचे आवाहन
जून महिन्याच्या वीजबिलामध्ये एप्रिल व मे महिन्यातीलही वाढ जमा करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना वीजबिल वाढल्याचे चित्र दिसत आहे. परंतु, ही दरवाढ दरवर्षीप्रमाणेच असून नागरिकांनी बिल भरून हेस्कॉमला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
-विनोद करुर, प्रभारी साहाय्यक कार्यकारी अभियंते









