पाणीटंचाईवर आमदार राजू सेठ यांची बैठक
बेळगाव : पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उत्तरचे आमदार राजू उर्फ आसीफ सेठ यांनी सोमवारी महानगरपालिकेमध्ये तातडीची बैठक घेतली. या बैठकीला महानगरपालिकेमध्ये आयुक्त रुद्रेश घाळी व एल अॅण्ड टीचे अधिकारी हार्दिक देसाई, कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. पाऊस नसल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. शहराला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत त्यांनी माहिती घेतली व सध्याच्या परिस्थितीत कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा केली. सध्या हिडकल जलाशयातील पाण्याचा उपसा वाढवावा, अशी सूचना आमदारांनी केली. तसेच ज्या कूपनलिका नादुरुस्त आहेत त्यांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी व अन्यत्र कूपनलिका खोदता येतील का? याचाही तपशील घेण्याची सूचना केली. बैठकीला मनपा अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.









