मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन
पणजी : राज्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाजीचे उत्पादन घेतल्यास आम्हाला अन्य राज्यातील भाज्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. राज्य फलोत्पादन महामंडळाकडून या भाज्यांची खरेदी करण्यात येईल व त्यांना चांगला भाव मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले. एका सरकारी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात विविध प्रकारची कृषी पिके घेतली जाऊ शकतात व त्यांची 100 टक्के खरेदी फलोत्पादन महामंडळाकडून करण्यात येऊ शकते. अन्य राज्यातून आणून खाण्यात येणाऱ्या भाजीपेक्षा इथल्या परंपरेनुसार स्वत: पिकवलेल्या भाजीची चव वेगळीच असते. परंतु दुर्दैवाने सध्या तसे होताना दिसत नाही. आम्हाला बाहेरून आणलेल्या भाजीची चव आवडू लागली आहे, असे सावंत म्हणाले.
तांत्रिक, आर्थिक साहाय्य देणार
स्वयंपूर्ण गोव्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन आदी व्यवसायात असलेल्या सर्वांना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांनी अर्ज सादर केल्यानंतर प्रत्येक 15 दिवसांनी मंजूर करण्यात येतील. त्याशिवाय सर्वांना तांत्रिक आणि आर्थिकही साहाय्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘मृदा आरोग्य पत्रिका’ मिळवावी
चांगले उत्पादन मिळविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने शेती सुरू करण्यापूर्वी मातीची चाचणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी मातीची चाचणी करून चांगल्या उत्पादनासाठी ‘मृदा आरोग्य पत्रिका’ मिळवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. फलोत्पादन महामंडळा अंतर्गत राज्यात सुमारे 1300 विक्री केंद्रांमधून भाजीपाला विकण्यात येतो. महामंडळ अन्य राज्यांमधून भाजीपाला खरेदी करते आणि या विक्रेत्यांना पुरवठा करते. अशावेळी जर आपण स्थानिक भाजीपाला उत्पादन वाढवले तर महामंडळ शेतकऱ्यांना चांगला दर देईल, ते म्हणाले.









