माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांची मागणी
बेळगाव : अनगोळ चौथे रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या दुतर्फा ठेवलेला सर्व्हिस रोड अरुंद आहे. त्यामुळे भविष्यात दुचाकी व तिचाकी वगळता इतर मोठी वाहने ये-जा करणे अशक्य आहे. याचा परिणाम येथील उद्योग व व्यवसायावर होणार असून यासंदर्भात रेल्वे विभागाने फेरविचार करावा, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा व खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. प्रत्यक्ष रस्त्याची रुंदी 60 फूट (18 मीटर) आहे. परंतु, सीडीपीनुसार रस्त्याची रुंदी 30 फूट (9.15 मीटर) आहे. अंडरपास ब्रिजचे काम सुरू झाले असून वाहतुकीसाठी दुतर्फा 11 मीटर रस्ते ठेवले आहेत.
तर केवळ 3.75 मीटर सर्व्हिस रोड आहेत. त्यामध्ये पदपथ, नाले व डिव्हायडरसाठी जागा दिली आहे. यामुळे सर्व्हिस रोड अतिशय अरुंद असून रेल्वेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार याचे बांधकाम होणार आहे का? याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. या परिसरात रुग्णवाहिका, तसेच इतर वाहने ये-जा करणे आवश्यक आहे. परंतु, अरुंद रस्त्यामुळे वाहतूक अवघड होणार असून रेल्वे राज्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन रोड अंडरब्रिजचे काम केले जाणार आहे. नागरिकांच्या मागणीनुसार किमान 20 फुटाचा सर्व्हिस रोड ठेवण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी, तसेच रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे आश्वासन व्ही. सोमण्णा यांनी दिले.









