मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मध्यान्ह आहार बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात गेल्या 10 वर्षांत वाढ करण्यात आलेली नाही. मानधनात वाढ करावी यांसह इतर मागण्या घेऊन मध्यान्ह आहार कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी शुक्रवार दि. 21 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन केंद्रीय मानव संसाधनमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नावे निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी नदाफ यांनी निवेदनाचा स्वीकार केला. मध्यान्ह आहार बनविणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सर्व 12 महिन्यांचा भत्ता देण्यात यावा. दरमहा किमान 26 हजार मानधन मिळावे, चतुर्थ श्रेणीचे शालेय कर्मचारी म्हणून मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना मान्यता देण्यात यावी, सध्या सेवा बजावत असलेल्या मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांत कपात करू नये,
यापूर्वी कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात यावीत, मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण देशभरात एकच नियम लागू करण्यात यावा, सणानिमित्त भत्ते देण्यात यावेत, प्रत्येक शाळेत किमान दोन मध्यान्ह आहार कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, सर्व शाळांमध्ये किचन शेड, पिण्यासाठी शुद्ध पाणी यासह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावात, अन्न शिजविण्यासाठी स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करावा, कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात यावी, वैद्यकीय विम्याची सवलत द्यावी, अपघातप्रसंगी 5 लाखांची मदत देण्यात यावी, 180 दिवसांची प्रसुतीकालिन रजा देण्यात यावी, तक्रार निवारणासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात यावी, दरवर्षी दोन सेट गणवेश द्यावेत आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना तुळजम्मा मनवाडकर, सुमन गडद, रेखा गावडे, तायव्वा कलपत्री यासह गैबू जैनेखान, मंदा नेवगी, एल. सी. नाईक उपस्थित होते.









