कित्तूर राणी चन्नम्मा चौकात आंदोलन : मुख्यमंत्र्यांना निवेदन
बेळगाव : आशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन धनासह किमान दहा हजार रुपये मानधन येत्या एप्रिल महिन्यापासून देण्याची व्यवस्था करावी. सर्व योजना कार्यकर्त्यांच्या मानधनात नुकतीच 1 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच वाढ आशा कार्यकर्त्यांच्या मानधनातही करावी, अशी प्रमुख मागणी घेऊन शेकडो संख्येने येथील राणी चन्नम्मा चौकात जमलेल्या आशा कार्यकर्त्यांनी भर उन्हात आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे जिल्हाधिकारी महंमद रोशन यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री सिद्धरामय्या यांनी मागील आठवड्यात मांडलेल्या अर्थसंकल्पात अंगणवाडी कार्यकर्त्या व मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात 1 हजार रुपये वाढीची तरतूद केली आहे. संपूर्ण राज्यात 42 हजार आशा कार्यकर्त्या असून त्यांनाही एक हजार रुपये मानधन वाढीचा लाभ मिळवून द्यावा. 60 वर्षे पूर्ण झालेल्या आशा कार्यकर्त्यांना सेवेतून निवृत्त न करता त्यांना पुढे सेवा करण्याची संधी द्यावी. केवळ अंगणवाडी कार्यकर्त्या व मध्यान्ह आहार बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ हा आशा कार्यकर्त्यांवर अन्याय आहे, असे निवेदनात म्हटले आहे.









