कोल्हापूर :
गाय दूध दरात कपात केल्याने शेतक्रयांचे दिवसा दहा कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. दूध दरात कपातीचा निर्णय मागे घ्यावा ही शेतक्रयांकडून मागणी होत आहे. यापार्श्वभूमीवर महावीर गार्डन येथे सोमवारी (दि.9) दूध उत्पादक शेतक्रयांची बैठक झाली. गाय दूध दरवाढ पूर्वीप्रमाणे करा अन्यथा उपोषण करुन असा इशारा यावेळी शेतक्रयांनी दिला. पुढील आंदोलनाची दिशा लवकरच ठरवण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिह्यातील सर्व खासगी, सहकारी दूध संघानी नोव्हेंबरपासून गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सूरु केली. फॅट व 8.5 एस.एन.एफसाठी किमान प्रतिलिटर दर 28 रुपये आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात इतर संघ 27 ते 28 रुपये अशा दराने गाय दूध खरेदी करत आहेत. फक्त कोल्हापूर जिह्यात 33 रुपये अधिक अंतिम दूध दर फरक असा जवळपास गाय दूध खरेदी दर 6 रुपये जास्त आहे. जिह्यातील गाय दूधाचा दर अधिक असल्याने लोणी, दूध भुकटी याची उत्पादन किमत जास्त येते असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही. तसेच सध्या स्थितीत गाय व म्हैस दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. येथुन पुढे देखील गाय दुधाची उपलब्धता चांगली असेल परंतु, दूध भुकटी व लोण्याच्या विक्री किमतीत कोणतेही वाढ दिसून येत नाही. दुधाच्या भुकटीचा दर कमी झाला आहे. गाय दूधाला जादा किंमत दिल्याने दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीवर त्याचा परिणाम होत असल्याने जिह्यातील सर्व खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर तीन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता.
गाय दूध दर कमी केल्यापासून जिह्यातील दूध उत्पादक शेतक्रयांमध्ये असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिक्रायांची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष जोतिराम घोडके यांनी दर कपातीसोबत शासनाने सात रुपयांचे अनुदान केल्याने शेतक्रयांना आर्थिक नुकसान होत आहे. ‘लम्पी‘मुळे अगोदरच पशुपालक अडचणीत आला आहे. सर्वच दूध संघांनी गाय खरेदी दर कमी केले मात्र दुग्धजन्य पदार्थाचे दर मात्र आहे तसेच ठेवले आहेत. शेतक्रयांचे आर्थिक नुकसान शासनाने भरुन काढावे, अनुदानासह दरवाढ करावी यामागशीसाठी येत्या चार दिवसात पोलीस प्रशासनाला पूर्वकल्पना देवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सचिन शिंदे (पोहाळे), सांगरुळच्या दत्त दूध संस्थेचे माजी अध्यक्ष विलास नाळे, कुंभी धरण संस्थेचे संचालक सरदार सासने, अर्जून चाबुक, अमर रजपूत, राजाराम पाटील, आनंद जाधव, अभिजीत चौगले, भैय्या काटकर, कुमार बोरचाटे आदी उपस्थित होते.








