राज्य संघटनेच्यावतीने सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन
बेळगाव : सध्या राज्यात शिक्षकांची कमतरता असल्याने अतिथी शिक्षकांवरच शिक्षण विभागाचा डोलारा उभा आहे. परंतु अतिथी शिक्षकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. केवळ तुटपुंजे वेतन देऊन बोळवण केली जात आहे. त्यामुळे दरमहा किमान 30 हजार रुपये मानधन लागू करावे, या मागणीसाठी बुधवारी सुवर्ण विधानसौधसमोर कर्नाटक राज्य सरकारी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अतिथी शिक्षक संघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. 2025-26 साली अतिथी शिक्षकांच्या भरतीमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार प्राधान्य द्यावे, दरमहा रजा म्हणजे दरवर्षी एकूण 12 रजा द्याव्यात, ज्या शाळेत सेवा बजावली त्या शाळेतून सेवा प्रमाणपत्र द्यावे, कर्तव्य कालावधीत महिला शिक्षकांना मानधनासह प्रसूती रजा द्याव्यात, आरोग्य विमा द्यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी बेळगावसह गुलबर्गा, बेंगळूर, हुबळी येथून पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रमोद बागेवाडकर, मोहन पाटील, गणपत बावकर, संतोष जाधव, विठ्ठल बावकर, वीणा कुंडेकर, अर्चना झेंडे, विश्वनाथ कुलकर्णी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
अतिथी प्राध्यापकांचे आंदोलन
राज्य सरकारच्या सरकारी प्रथमश्रेणी महाविद्यालयांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना 2024-25 मध्ये सेवेतून कमी करण्यात आले. यामुळे अतिथी प्राध्यापकांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना इतर नोकऱ्यांवर अवलंबून रहावे लागले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कौन्सिलिंग करावे. तसेच कौन्सिलिंग करेपर्यंत अतिथी प्राध्यापकांना मानधन चालू ठेवावे, अशी मागणी अतिथी प्राध्यापकांच्यावतीने करण्यात आली.
खानापूरच्या आमदारांबाबत नाराजी
बुधवारी झालेल्या अतिथी शिक्षकांच्या आंदोलनात सर्वाधिक शिक्षक हे खानापूर तालुक्यातील होते. सध्या खानापूर तालुक्यात 294 अतिथी शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खानापूरच्या आमदारांनी यावे, अशी मागणी शिक्षकांनी केली. परंतु सायंकाळपर्यंत खानापूरचे आमदार फिरकले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.









