खासदार प्रियांका जारकीहोळी यांची लोकसभेत मागणी
बेळगाव : डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी चिकोडी न्यायालयामध्ये विचार मांडले होते. त्या मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल आपल्याला अभिमान असल्याचे सांगत देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण महत्त्वाचे असून शिक्षणाला अनुदान वाढवून देण्यात यावे, असे विचार खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले. देशाच्या प्रगतीमध्ये गुणात्मक शिक्षण महत्त्वाचे ठरते. प्रत्येकाला शिक्षण मिळणे गरजे आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर सभागृहात शिक्षणाचा मुद्दा मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. देशात शिक्षणाचा दर्जा घसरत आहे. यामुळे देशासमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. याला अनेक कारणे असून केंद्र सरकारने शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात कपात केली जात आहे.
यावेळी गेल्या वर्षीचे अनुदान व यावर्षी अर्थसंकल्पातील अनुदानाचा फरक दाखवून 53 टक्के अनुदान कमी असल्याचे सांगितले. सरकारी शिक्षणावर अवलंबून असणाऱ्या गोरगरिबांना याचा फटका बसत आहे. शिक्षणाचे खासगीकरण वाढत असल्याने गोरगरीब, अनुसूचित जाती जमाती, ग्रामीण भागातील तरुण व मागासवर्गीय या संधीपासून वंचित राहात आहेत. याला काय पर्याय आहे? असा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. नुकताच झालेल्या नीट परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. यामध्ये झालेल्या चुका तरुणांसाठी मारक ठरत आहेत. यामुळे सरकारवरील विश्वास कमी होत आहे. अथणी आणि गोकाक तालुक्यात केंद्रीय विद्यालय मंजूर करावे यासाठी त्यांनी प्रस्ताव ठेवला. जिल्ह्यात पुरामुळे मोठा फटका बसला असून सरकारी शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक शाळेला 2 लाख रुपये मंजूर करावे, अशी मागणीही त्यांनी सभाध्यक्षांकडे केली.









