जळगाव / प्रतिनिधी :
आरक्षणाची 50 टक्क्यांची आज असलेली मर्यादा वाढविली पाहिजे. त्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
याबाबत बोलताना पवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढविणे महत्त्वाचे आहे. अशी मर्यादा वाढविल्याशिवाय मूळ प्रश्न सुटणे कठीण आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण हे ओबीसी कोटय़ातून दिले जाऊ नये. कुणबी आणि मराठा असा वाद निर्माण करू नका. देशातील अनेक जागांवर भाजपाने उमेदवार बदलण्याची तयारी सुरू केली आहे. याचा अर्थ जनता आमच्या पाठीशी आहे. भाजपाच्या जागा पराभूत करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार असून, महाराष्ट्रातच नव्हे; तर आगामी लोकसभा निवडणुकीत आहे ते चित्र बदललेले दिसेल. एक देश एक निवडणूक हा मुद्दा देशवासीयांचे लक्ष विचलित करण्यासाठी पुढे आणण्यात आला आहे.
दरम्यान, सकाळी शरद पवार यांचे जळगावात आगमन झाले असता त्यांचे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. दुपारी त्यांनी सागर पार्क मैदानावर जाहीर सभादेखील घेतली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही शरद पवारांची पहिलीच सभा होती. त्यामुळे या सभेकडे सगळय़ांचे लक्ष लागून राहिले होते. सभेत बोलताना शरद पवार यांनी खानदेशचा इतिहास हा अभिमानास्पद असल्याचे सांगत काँग्रेसचे पहिले अधिवेशन जळगाव जिल्हय़ात फैजपूर येथे गांधी व नेहरूंच्या उपस्थितीत झाल्याचे सांगितले.
दुष्काळाचे सावट असतानाही सरकार निश्चिंत
आज राज्यावर दुष्काळाचे सावट असून मोठय़ा प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत आहे. टँकरने पाणी आणावे लागत आहे. शेतकरी संकटात आहेत आणि तरीही शासन उदासीन आहे. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था व चिंता नाही. सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात गेली असून, मोदींनी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फोडल्याचा आरोपही पवार यांनी या वेळी केला. दरम्यान, सभेला पक्षाचे नेते अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, अरुण गुजराथी, एकनाथ खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी उपस्थित होते.








