रामनगौडा कन्नोळ्ळी : ‘चिगुरु 2025-26’ उत्साहात
बेळगाव : मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन वाढविण्यासाठी बालप्रतिभा कार्यक्रम उपयोगी ठरतात. बालप्रतिभासारखे कार्यक्रम वरचेवर भरवून मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत समाजकल्याण खात्याचे सहसंचालक रामनगौडा कन्नोळ्ळी यांनी व्यक्त केले. कन्नड-सांस्प़ृतिक खात्याच्यावतीने शनिवारी कुमार गंधर्व रंगमंदिरात ‘चिगुरु 2025-26’ हा बालप्रतिभा कार्यक्रम झाला. याप्रसंगी कन्नोळ्ळी बोलत होते. मुलांमध्ये कलागुण असतातच. शिक्षणाद्वारे कलागुण विकसित केले पाहिजेत. कलेच्या अभिव्यक्तीद्वारे मुले आपली कला प्रकट करू शकतात. कलेतून मुलांचे सुप्त गुण प्रकट होत असतात. सरकारकडून 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चिगुरुसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. सरकारचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे कन्नोळ्ळी म्हणाले. कन्नड-सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री म्हणाल्या, मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळवून देणे हा चिगुरु कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सतार वादन, वचन गायन, वचन संगीत, रुपक, समूह नृत्य, एकपात्री अभिनय यासारखे कलाविष्कार सादर केले. ज्येष्ठ कलाकार सत्यनारायण भट, रोहिणी गंगाधरय्या, यल्लाप्पा नायकर, गूळप्पा विजयनगर यासह कन्नड-सांस्कृतिक खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.









