महाराष्ट्रातून आवक अधिक : स्थानिक उत्पादकांना फटका : नांगर फिरविण्याची वेळ
बेळगाव : परराज्यांतून मोठ्या प्रमाणात कलिंगडची आवक झाल्याने बेळगाव जिल्ह्यात कलिंगडचे दर घसरले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरात घट झाल्याने कलिंगड शेतीवर नांगर फिरविण्याची वेळ येणार आहे. जिल्ह्यात 251 हेक्टर क्षेत्रात कलिंगडची लागवड करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. मात्र महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. त्यामुळे स्थानिक कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसू लागला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात कलिंगडचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शिवाय उत्पादित कलिंगड बेळगाव जिल्ह्यात विक्री केली जातात. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना अपेक्षीत दर मिळत नसल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांतून खंत
आवक अधिक झाल्याने 10 ते 15 रुपये किलो दराने कलिंगड विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काही वेळा 5 ते 8 रुपये किलो दराने कलिंगड विकावे लागत आहे. यातून उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.









