संकेश्वर : यंदा पहिल्यादांच आर्द्रा नक्षत्राने पहिल्या दिवसापासून हजेरी लावून किमयाच केली आहे. 8 मे पासून सुरु झालेल्या वळिवाने साथ दिल्याने पावसाळी हंगामाला भरतीच आली आहे. प्रतिवर्षी पुष्य नक्षत्राच्या (म्हातारा) पावसाने हंगामाला सुरुवात होत असल्याचे चित्र होते. पण यंदाची सुरुवात जोरदार झाली आहे. पहिल्याच पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत होत असलेल्या मोठ्या वाढीमुळे पूर परिस्थितीच्या दिशेने कूच होत आहे.
गत दोन दिवसांपासून पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. मुसळधारपणे कोसळणाऱ्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सततच्या हजेरीने नाले, ओढ्यातून पाणीच पाणी वाहू लागले आहे. तर तालुक्यातील हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी व मार्कंडेय या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. नजीकच्या महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. आठवडाभरात पावसाची परिस्थिती अशीच असल्यास नद्यांना पूर परिस्थिती प्राप्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रातील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे.
हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशयात मंगळवार 24 रोजी 19.56 टीएमसी पाणीसाठा आहे. तर गतवर्षी यादिवशी 8.3 टीएमसी पाणीसाठा होता. गत वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अधिक असून पावसात सातत्य असल्यामुळे 17 टीएमसीने मोठी वाढ दिसून येत आहे. जलाशयात दररोज 12850 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याचे प्रमाण शुन्य आहे. पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता आगामी पंधरवड्यात जलाशय 50 टक्के भरणार अशी चिन्हे आहेत. हिरण्यकेशी नदीकाठावर भेट देऊन तहसीलदार मंजूळा नाईक, उपतहसीलदार सी. ए. पाटील, मुख्याधिकारी प्रकाश मठद व नोडल अधिकाऱ्यांनी पाणीपातळीचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदारांनी नोडल अधिकाऱ्यांना सूचना केल्या.









