सर्वच भाज्या महागल्या, सर्वसामान्यांना फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
पाऊस लांबणीवर पडल्याने भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. टॉमेटो, ढबू, गाजर, बिन्स, ओली मिरची, फ्लॉवर, कोबी, कारली, दोडकी, मेथी, पालक, शेपू, लालभाजी, कोथिंबीर आदी भाज्यांचे दर वाढले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत वांगी, टोमॅटो आणि पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या भाजीपाला दरांचा चटका सहन करावा लागत आहे.
शनिवारच्या किरकोळ आठवडी बाजारात कोबी 20 रुपयाला एक, फ्लॉवर 40 रुपयाला एक, शेवग्याच्या शेंगा 20 रुपयाला एक पेंडी, बटाटा 30 रु. किलो, टोमॅटो 40रु. किलो, ढबू 60 रु. किलो, गाजर 60 रु. किलो, भेंडी 50 रु. किलो, बिन्स 80 रु. किलो, ओली मिरची 80 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, गवार 80 रु. किलो, काकडी 60 रु. किलो, कारली 60 रु. किलो, दोडकी 60 रु. किलो, कांदा पात 20 रुपयाला तीन पेंड्या, लालभाजी 10 रुपयाला एक 20 रुपयाला तीन, शेपू 20 रुपयाला एक पेंडी, पालक 10 रुपयाला एक 20 रुपयाला तीन पेंड्या, कोथिंबीर 30 ते 40 रुपयाला एक पेंडी, मेंथी 25 रुपयाला एक पेंडी असा भाजीपाल्याचा दर आहे.
यंदा वळिवाने दडी मारली आहे. त्यामुळे नवीन भाजीपाला उत्पादन थांबले आहे. शिवाय पाऊसदेखील लांबणीवर पडला आहे. त्यामुळे पाणीसाठा घटला आहे. परिणामी शिवारात भाजीपाल्यांसाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पादनही कमी झाले आहे. बाजारात आवक कमी होत असल्याने भाजीपाल्याचे दर हळुहळू वाढू लागले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत सर्वच भाज्यांचे दर वाढल्याचे दिसत आहेत. प्रती किलोमागे भाजीपाल्याचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण होऊ लागले आहे.
रसरशीत लिंबू झाला स्वस्त
मागील पंधरा दिवसापूर्वी 10 रुपयाला एक विकला जाणारा लिंबू आता एक रुपयाला एक झाला आहे. लिंबूची आवक वाढल्याने लिंबू बाजारात लिंबूच लिंबू झाले आहेत. दरम्यान, दरातदेखील मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे लिंबुची खरेदी वाढू लागली आहे.
बाजारात विविध जातीचे आंबे
बाजारात विविध जातीचे आंबे दाखल झाले आहेत. हापूस, तोतापुरी, निलम, पायरी आदी जातींचे आंबे दाखल झाले आहेत. 200 ते 400 रुपये डझन याप्रमाणे विक्री होऊ लागले आहे. हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्याने आंबा मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागला आहे. दरातदेखील काहीशी घसरण झाल्याचे दिसत आहे.









