रिसालदार गल्ली परिसरात वाढती समस्या : कारवाईची मागणी
बेळगाव : रिसालदार गल्ली येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चारचाकी वाहने लावली जात असल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तहसीलदार कार्यालय तसेच बेळगाव वनमध्ये कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने पाविर्ढिंग होईल, अशा पद्धतीने व्यवस्था करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. रिसालदार गल्ली येथे बेळगाव शहरासह तालुक्याचे तहसीलदार कार्यालय आहे. त्यामुळे दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. त्याचबरोबर बेळगाव वन, रामकृष्ण मिशन आश्रम, स्टेट बँक व इतर सरकारी कार्यालये या गल्लीत असल्याने नेहमीच गर्दी असते. अशा स्थितीत काही बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने लावली जात असल्याने एखादे मोठे वाहन आल्यास येण्या-जाण्यास जागाच उपलब्ध नसते. यामुळे वारंवार या गल्लीमध्ये वाहतूक कोंडी होते.
जागा मिळेल तेथे पार्किंग…
वाहनचालकांना पोलिसांचा धाक उरला नसल्याने आपल्याला जेथे जागा मिळेल, तेथे वाहने लावली जातात. रिसालदार गल्लीबरोबरच गणाचारी गल्ली, नार्वेकर गल्ली, समादेवी गल्ली या परिसरात चारचाकी वाहने लावली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे अडचण निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.









