कडधान्य-डाळींच्या दराचा भडका, तूरडाळ 180 रुपये किलो
प्रतिनिधी / बेळगाव
ऐन सणासुदीच्या काळात कडधान्य आणि डाळींच्या दरांचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. प्रतिकिलो डाळींच्या किमती 20 ते 40 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिक आणि गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला आहे. 160 रुपये असणारी तूरडाळ 180 रुपये किलो झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता आमटीचा चटका सहन करावा लागत आहे.
मागील दोन महिन्यांपासून कडधान्य आणि डाळींच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कडधान्य आणि डाळी खरेदी करणे अशक्य झाले आहे. मूगडाळ 120 रुपये किलो, हरभराडाळ 90 रु. किलो, मसूरडाळ 90 रु. किलो, तर तूरडाळ 180 रु. किलो झाली आहे. तूरडाळ दोनशे रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे. विशेषत: हॉटेल, मेस, रेस्टॉरंट आणि कॅन्मटीन व्यवसायांवर परिणाम झाला आहे.
मटकी, मूग, चवळी, छोले आदी कडधान्यांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे काय खावे? असा प्रश्नही पडू लागला आहे. भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्यात असला तरी तेल, साखर, डाळी आणि कडधान्यांचे दर भरमसाट वाढल्याने दैनंदिन गरजांसाठी सर्वसामान्यांना संघर्ष करावा लागत आहे. इंधन, गॅस आणि इतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत चालल्याने जगणे असह्या होऊ लागले आहे.









