पावसात भिजण्याची वेळ, प्रवाशांची गैरसोय
बेळगाव : प्रवाशांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे फलाट आणि बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी होत आहे. परिणामी काही प्रवाशांना भर पावसात थांबावे लागत आहे. प्रवाशांसाठी उभारण्यात आलेली थांबे कमी पडू लागल्याने गैरसोय होऊ लागली आहे. तर काही प्रवाशांना भिजतच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. 11 जूनपासून महिलांचा मोफत बसप्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बसस्थानकात पुरुषांपेक्षा महिला प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातील बस थांबे प्रवाशांनी फुल्ल होऊ लागले आहेत. त्यामुळे काही प्रवाशांवर बसथांबे सोडून रस्त्यावर थांबण्याची वेळ आली आहे.
प्रवाशांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर
स्मार्ट सिटी अंतर्गत सुसज्ज बसस्थानक उभारले आहे. तब्बल 31 कोटींच्या निधीतून हा विकास साधण्यात आला आहे. बसस्थानकात स्थानिक आणि लांब पल्ल्यांच्या प्रवाशांसाठी फलाट आणि बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र आता हे बसथांबेदेखील प्रवाशांसाठी अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. शक्ती योजनेपासून प्रवाशांच्या संख्येत भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे बसस्थानक प्रवाशांनी गजबजू लागले आहेत.









