निकृष्ट पशु खाद्यपदार्थाची विक्री : पाळीव प्राण्यांना धोका
बेळगाव : राज्यासह जिल्ह्यात बेकायदेशीर पेट शॉपची (पाळीव प्राण्यांची दुकाने) संख्या वाढली आहे. त्यामुळे प्राणीप्रेमीतून संताप व्यक्त होऊ लागला आहे. या शॉपमधून निकृष्ट दर्जाच्या खाद्य पदार्थाची विक्री होत असल्याने पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ लागला आहे. पशुसंगोपन खाते अशा बेकायदेशीर पेट शॉपना आळा घालणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. बेंगळूर, धारवाड, म्हैसूर, बेळगाव आणि राज्यभरात अडीच हजारहून अधिक पाळीव प्राण्यांची दुकाने, दवाखाने आहेत. यामध्ये कुत्रे, मांजर आणि पक्ष्यांची विक्री केली जाते. विशेषत: यामध्ये निम्म्याहून दुकाने बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे. या दुकानांमध्ये विनापरवाना उपचार, औषधे आणि खाद्यांची विक्री होऊ लागली आहे. मागील चार वर्षांत पाळीव प्राण्यांची दुकाने आणि प्राण्यांचे दवाखाने सुरू होण्याचे प्रमाण 45 टक्क्यांनी वाढले आहे. अशा दुकानांमध्ये कोट्यावधीची उलाढाल होत आहे. शिवाय विदेशी जातींचे कुत्रे, मांजर आणि पक्ष्यांची विक्री वाढली आहे. या पाळीव प्राण्यांच्या किमती साधारण 15 हजार ते 2 लाखांपर्यंत आहेत.
औषधांची बेकायदेशीर विक्री
अलीकडे शहरात पाळीव कुत्रे, मांजर आणि विविध पक्षी पाळण्याचे फॅड वाढले आहे. त्यामुळे सहजीकच त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पेट शॉपना पशु संगोपन खात्याच्या अधिकाऱ्यांचाच वरदहस्त असल्याचे बोलले जाते. अशा बेकायदेशीरपणे औषधे विक्री करणाऱ्या पेट शॉपना वेसन घालणार का? असा प्रश्न पडू लागला आहे.
उपचाराच्या नावाखाली लूट
पाळीव प्राण्यांच्या दुकानांमध्ये उपचाराच्या नावाखाली लूट केली जात आहे. जखमी मांजर आणि कुत्र्यांच्या ऑपरेशनसाठी 15 ते 25 हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. शिवाय औषध, खाद्य पदार्थांसाठी 5 ते 18 हजार रुपयांपर्यंत खर्च केला जात आहे. पाळीव प्राण्यांच्या उपचार करण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. शासनाने तातडीने हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणीही होत आहे.
प्रशासनाने लक्ष घालावे
शहरात सुरू असलेली पाळीव प्राण्यांची दुकाने आमच्या नियंत्रणात येत नाहीत. याकडे प्रशासनाने लक्ष घालावे. पशु खाद्य, औषधे यांच्या गुणवत्तेबाबतही आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही.
राजीव कुलेर, (सहसंचालक पशुसंगोपन खाते)









