मार्कंडेय नदीतील पाण्याचा प्रवाह सुरू
वार्ताहर/ तुडये
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने ओढ दिल्याने राकसकोप जलाशयाला येऊन मिळणाऱ्या मार्कंडेय नदी, जांभूळ ओहळ आणि सर्व नाले कोरडे होते. परिणामी जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होणे अडचणीचे बनले होते. गुरुवारी झालेल्या 33.2 मि.मी., शुक्रवारी 36.5 मि.मी., शनिवारी 45.1 मि.मी. पावसामुळे अखेर शनिवारी मार्कंडेय नदीतील पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने राकसकोप जलाशयात वाढ झाली आहे.
शनिवारी सायंकाळी 6 वाजता राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत शुक्रवारपेक्षा अर्धाफुटाने वाढ होत 2448.10 फूट इतकी वाढ झाली आहे. सध्या जलाशय पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरुवात केल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यापूर्वी अनेकवेळा जलाशयाने आपली पाणीपातळीची क्षमता पूर्ण केली होती. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून 27 फूट पाणीपातळी होण्याची आवश्यकता आहे.









