1570 रुपये दर झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजी
बेळगाव : शेतकऱ्यांच्या सुक्या चाऱ्याचे संरक्षण व्हावे, यासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात ताडपत्री दिली जाते. मात्र, या ताडपत्रीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. कृषी खात्याकडून सवलतीच्या दरात ताडपत्र्यांचे वितरण होते. मात्र, दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांना नाराज होऊन माघारी परतावे लागत आहे. पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांकडून ताडपत्रीची खरेदी होते. रयत संपर्क केंद्रातून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात ताडपत्र्या दिल्या जातात. मात्र, या ताडपत्र्यांच्या किमती आता वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ताडपत्रीसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. पूर्वी 1100 ते 1200 रुपये असणारा ताडपत्रीचा दर आता 1570 रुपये झाला आहे. त्यामुळे कष्टकरी शेतकऱ्याला वाढीव दराचा सामना करावा लागत आहे.
ताडपत्री दरात मोठी वाढ
शेतकरी जोडव्यवसाय म्हणून जनावरे पाळतात. दरम्यान, या जनावरांसाठी सुक्या चाऱ्याची साठवण करतात. हा चारा खराब होऊ नये म्हणून यावर जाड ताडपत्री अंथरतात. त्यामुळे शेतकऱ्यांना ताडपत्री गरजेची बनली आहे. पावसाला सुरुवात होताच या ताडपत्रीची मागणी वाढते. बाजारपेठेच्या तुलनेत कृषी खात्याकडून कमी दरात ताडपत्री मिळते. मात्र, यंदा ताडपत्रीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे.









