आतापर्यंत बेळगावात 38 तर संपूर्ण राज्यात दीड हजार बळी : कोरोना, आर्थिक मंदी, कर्जबाजारीपणामुळे संपविले जीवन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात आत्महत्यांच्या घटना वाढीस लागल्या आहेत. कोरोना महामारीमुळे झालेले लॉकडाऊन, आर्थिक मंदी, नोकऱया गमावण्याचा प्रकार, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे जीवन संपविणाऱयांची संख्या वाढती आहे. कोणी गळफास घेऊन तर आणखी काही विष पिऊन जीवन संपवित आहेत. रेल्वेखाली जीव देणाऱयांची संख्याही काही कमी नाही.गेल्या तीन वर्षांत 129 जणांनी जिल्हय़ात रेल्वेखाली मृत्यू झाल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. यापैकी 69 जणांनी आत्महत्या केली आहे. 2020 मध्ये 39 जणांचा तर 2021 मध्ये 52 जणांचा रेल्वेखाली मृत्यू झाला आहे. 2022 च्या जुलै अखेरपर्यंत रेल्वेखाली 38 जण दगावले आहेत. दोन वर्षांच्या तुलनेत चालू वषी रेल्वेखाली होणारे मृत्यू व आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
रेल्वे पोलीस स्थानकाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. कॅसलरॉकपासून महाराष्ट्राच्या सीमेवरील शेडबाळपर्यंत घटना-घडामोडींवर बेळगाव रेल्वे पोलिसांनाच लक्ष ठेवावे लागते. शेडबाळजवळ किंवा कॅसलरॉकजवळ एखाद्या व्यक्तीचा रेल्वेखाली मृत्यू झाला तर रेल्वे पोलिसांना बेळगावहून तेथे पोहोचावे लागते. त्यानंतरच पुढील सोपस्कार पूर्ण केले जातात.
उपलब्ध माहितीनुसार 2020 मध्ये रेल्वेखाली 39 जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेरूळ ओलांडताना 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर 21 जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर एकाचा तर काही ठिकाणी तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. 39 पैकी 30 जणांची ओळख पटली आहे.
2021 मधील आकडेवारी लक्षात घेता मृत्यूंची संख्या वाढती आहे. रेल्वेरूळ ओलांडताना 14 जणांचा तर प्लॅटफॉर्मवर 5 जणांचा इतर ठिकाणी दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 31 जणांनी आत्महत्या केली आहे. वर्षभरात 52 जणांचा रेल्वेखाली मृत्यू झाला आहे. यापैकी 41 जणांची ओळख पटली आहे.
चालू वषी 1 जानेवारी 2022 ते 31 जुलैपर्यंत एकूण 38 जणांचा रेल्वेखाली मृत्यू झाला आहे. यापैकी 17 जणांनी आत्महत्या केली आहे. 5 जणांचा धावत्या रेल्वेतून पडून व नैसर्गिकरित्या मृत्यू झाला आहे. 38 पैकी 29 जणांची ओळख पटली आहे. इतरत्र खून करून रेल्वेखाली आत्महत्या भासविण्याचे प्रकारही घडतात.
बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्काराची वेळही रेल्वे पोलिसांवरच
खानापूर, रायबाग व सुलधाळजवळ अशा घटना घडल्या आहेत. या प्रकरणांचा तपास स्थानिक पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. कमीत कमी मनुष्यबळ व साधनसुविधा नसताना रेल्वे पोलिसांना काम करावे लागते. एखाद्या मृतदेहाची ओळख पटली नाही तर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने किंवा महानगरपालिकेच्या मदतीने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळही रेल्वे पोलिसांवरच येते.
गेल्या तीन वर्षात रेल्वेखाली मृत्युमुखी पडलेल्या 129 पैकी 19 जणांची ओळख पटली नाही. यासाठी प्रयत्न करूनही पोलिसांना मृतांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचता आले नाही. अशा मृतदेहांवर रुक्मिणीनगर येथील सरकारी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. भविष्यात त्यांच्या कुटुंबीयांचा ठावठिकाणा सापडला तर मृताच्या अंगावरील कपडे व त्याच्याजवळ आढळलेल्या वस्तूंवरून ओळख पटविण्याची पद्धत आहे.
रेल्वेखाली मृत्युमुखी पडणाऱया किंवा आत्महत्या करणाऱयांचे मृतदेह छिन्नविछिन्न होतात. अक्षरशः तुकडे गोळा करून ते शवागारात पाठवावे लागतात. यासाठी कोणीच पुढे येत नाहीत. अशा परिस्थितीत सेवाभावी संघटना व व्यक्तींच्या मदतीने ही कामे उरकावी लागतात. जेणेकरून रेल्वे पोलिसांना नेहमी समस्यांशी झुंज देतच कामे करावी लागतात.
ही बेळगावातील स्थिती आहे तर संपूर्ण राज्यात गेल्या तीन वर्षांत 1 हजार 455 जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सात वर्षांतील हा आकडा 5 हजार 210 हून अधिक आहे. गेल्या सहा महिन्यांत राज्यातील वेगवेगळय़ा रेल्वेस्थानकांजवळ 374 जणांनी रेल्वेखाली आपले जीवन संपविले आहे. रेल्वेखाली होणारे मृत्यू व आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. बेळगाव शहराजवळ होणाऱया घटना टाळण्यासाठी रेल्वेरूळांच्या बाजूने भिंत उभारण्याचे कामही सुरू आहे.
सेल्फी काढण्याचा प्रयत्न ठरतोय जीवघेणा…
केवळ आत्महत्या करण्यासाठी रेल्वेखाली झोकून देणाऱयांचाच मृत्यू होतो, असे नाही. कोणत्या तरी तंद्रीत रेल्वेरूळ ओलांडणाऱयांचाही मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. वॉकिंगसाठी घराबाहेर पडणारे वृद्ध जर वयोमानानुसार कमी ऐकू येत असेल तर रेल्वेचा बळी ठरतात. तर कानात हेडफोन घालून गाणी ऐकत रेल्वेरूळावरून जाणारे तरुण गेटबंद झाल्यानंतरही बेसावध असतात. रेल्वेरूळ ओलांडताना रेल्वेचा आवाज त्यांना ऐकू येत नाही. त्यांचाही बळी जातो. तर आणखी काही जण रेल्वेरूळावर झोपण्याचा किंवा रेल्वे येताना सेल्फी काढण्याचा प्रयोग करतात. हा प्रयोगही जीवघेणा ठरतो.









