देशात 71 शहरांमधील 2,398 सरकारी शाळांमध्ये योजना लागू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग किती लाभदायक ठरत आहे, हे नुकतेच दिसून आले आहे. भारताच्या काही शहरांमध्ये स्मार्ट वर्ग किंवा स्मार्ट क्लासरुम्स ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे या शहरांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश संख्येत 22 टक्के इतकी मोठी वाढ दिसून आली आहे.
2015 मध्ये ही योजना लागू करण्यात आली होती. प्रथम या योजनेसाठी 19 शहरांची निवड करण्यात आली होती. 2015 पासून 2024 पर्यंतच्या कालावधी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 22 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक या आधुनिक तंत्रज्ञानाला उत्साहवर्धक प्रतिसाद देत आहेत, असा अनुभव येत आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
71 शहरांमध्ये विस्तार
सध्या ही योजना भारतातील 71 शहरांमधील 2 हजार 398 सरकारी शाळांमध्ये लागू करण्यात आली आहे. या शाळांमध्ये स्मार्ट क्लासरुम्स स्थापन करण्यात आल्या आहेत. कर्नाटक राज्यात स्मार्ट क्लासरुम्सची संख्या देशात सर्वात जास्त, म्हणजे 80 इतकी आहे. त्याखालोखाल राजस्थानात 53, तामिळनाडूत 23, दिल्लीत 12 तर पश्चिम बंगालमध्ये केवळ 2 स्मार्ट क्लासरुम्स आहेत.
शिक्षकांकडून स्वागत
ही योजना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणविषयक स्वारस्य निर्माण करण्यात उपयोगी पडत आहे, अशी प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी व्यक्त केली. अशा वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय असते. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षण घेणे आवडते. हा शिकणाऱ्यांसाठी एक नवा आणि सुखद अनुभव आहे, असे मत अनेक शिक्षकांनी नोंदविल्याने या योजनेचा आणखी विस्तार केला जाणार आहे.
डिजिटल वाचनालयेही लोकप्रिय
या योजनेशिवाय आणखी 41 शहरांमधील अनेक शाळांमध्ये डिजिटल वाचनायल ही संकल्पना लागू करण्यात आली आहे. या वाचनालयांची एकंदर आसनक्षमता 7 हजार 809 इतकी आहे. छत्तीसगडमधील रायपूर आणि कर्नाटकातील तुमकूर या शहरांसह अनेक राज्यांमधील शहरांमध्ये आता अशी वाचनालये शाळांमधून स्थापन करण्यात येत आहेत. स्मार्ट क्लासरुम ही योजना केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहर कल्याण विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे.









