इंधन दरवाढीचा परिणाम : शेतकऱ्यांना फटका
बेळगाव : रासायनिक खताचा वाढता दर, वाढलेली मजुरी, बियाणे आणि आता इंधन दरात वाढ झाल्याने शेती यंत्रसामग्रीच्या भाडेदरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कृषी यंत्राचा वापर केला जातो. बैलजोड्यांची संख्या अलिकडे कमी झाली आहे. त्याठिकाणी टॅक्टर, पॉवर ट्रिलर आणि इतर यंत्रसामग्रीची संख्या वाढली आहे. मात्र सरकारने इंधनाच्या दरात वाढ केल्याने शेतीतील यंत्रसामग्रीच्या भाडेदरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या खर्चात वाढ होणार आहे. मजुरी, रासायनिक खते, बियाणे आणि शेती मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने एकूण उत्पन्नातून केलेला खर्चदेखील जात नसल्याची खंत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेती नकोशी वाटू लागली आहे.
नैसर्गिक आपत्ती, पावसाची अनिश्चितता, कीडीचा प्रादुर्भाव, अनेक संकटामुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात शिल्लक काहीच राहत नाही. त्यातच शेतमालाचे भाव घसरत असल्याने शेतकरी अनेक संकटात सापडले आहेत. असे असताना पुन्हा इंधन दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीतील ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर आणि इतर यंत्रसामग्रीच्या भाडेदरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेती उत्पादनासाठी येणारा खर्च भागविताना शेतकऱ्यांचे नाकीनऊ होणार आहे. ट्रॅक्टरचे भाडे पूर्वी तासासाठी 800 ते 1000 रुपये हेते. आता ते 1500 ते 2000 रुपयांवर गेले आहे. त्याबरोबर नांगरणी आणि इतर कामासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्याबरोबर शेतमालाची बाजारपेठेपर्यंत वाहतूक खर्चही महागला आहे. एकूणच शेतकऱ्यांना वाढत्या महागाईला सामोरे जावे लागणार आहे.
अर्थसंकल्पात इंधन अनुदानासाठी तरतूद नाही
शेतकऱ्याच्या हितासाठी सरकार एकरी अडीचशे रुपये इंधन अनुदान खर्च देत होते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात इंधन अनुदान योजनेसाठी निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागणार आहे.
– शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषीखाते)









