सर्वसामान्य प्रवाशांना फटका : दिवाळीच्या संधीचा फायदा
► प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळीच्या सणासाठी प्रवाशांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. या संधीचा फायदा घेत खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. विविध मार्गांवर धावणाऱ्या खासगी बसधारकांनी भाडे दरात वाढ केली आहे. त्यामुळे लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे.
दिवाळी सणासाठी मूळगावी परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. बेंगळूर, म्हैसूर, गोवा, पुणे, मुंबई, हैदराबाद येथून ये-जा करणारे प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे परिवहन मंडळाच्या बसबरोबरच खासगी बसेसदेखील फुल्ल होऊन धावू लागल्या आहेत. प्रवासीसंख्येत वाढ झाल्याने या संधीचा फायदा घेत खासगी वाहनधारकांकडून अधिक भाडे आकारले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसू लागला आहे.
विकेंडसह सलग सुट्यांमुळे ये-जा करणारे प्रवासी वाढले आहेत. या तुलनेत परिवहनच्या बसफेऱ्या कमी असल्याने प्रवासी खासगी बसेसला पसंती देऊ लागले आहेत. मात्र खासगी बसधारकांकडून तिकीट भाडे अधिक प्रमाणात आकारले जात आहे. बेळगाव-मुंबई, बेळगाव-गोवा, बेळगाव-बेंगळूर, बेळगाव-म्हैसूर, बेळगाव-मंगळूर, बेळगाव-हैदराबाद आदी मार्गांवर धावणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांकडून जादा पैसे घेतले जात आहेत.









