60 रुपये किलो, ओली मिरची महागली, सर्वसामान्यांना फटका
बेळगाव : कडधान्य, डाळी पाठोपाठ भाजीपाल्यांच्या दरातदेखील वाढ झाली आहे. विशेषत: 40 रुपये असणारा टोमॅटो 60 रुपये किलो झाला आहे. त्याचबरोबर भेंडी वगळता इतर भाज्या प्रतिकिलो 60 रुपयांपुढे गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण होऊन बसले आहे. दैनंदिन आहारात लागणाऱ्या टोमॅटोच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने सामान्य गृहिणी आणि व्यावसायिकांच्या बजेटवर परिणाम झाला आहे. मागील आठवड्यात टोमॅटोचा दर 40 रुपये किलो होता. मात्र आवक कमी झाल्याने सोमवारपासून टोमॅटो 60 रुपयावर गेला आहे. याचबरोबर इतर भाज्यांचेदेखील दर वाढले आहेत. ओली मिरची 100 रुपये किलो झाली आहे. त्यामुळे वाढत्या मिरचीच्या दराचा ठसका सर्वसामान्यांना लागला आहे. दोडकी, गवार, कारली, बीन्स, वांगी, मेथी या सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी 10 ते 15 रुपये किलो विकला जाणारा टोमॅटो तब्बल 60 रुपये किलो झाला आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. शिवाय वादळामुळे टोमॅटो पिकावर परिणाम झाल्याने आवक मंदावली आहे. टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून सर्वच भाजीपाल्यांचे दर हळुहळू वाढू लागले आहेत. मात्र टोमॅटो एका दिवसात प्रतिकिलो 20 रुपयांनी वाढला आहे.
महागाईचा सर्वांनाच फटका
वीजबिल, गॅस, इंधन, किराणा मालाच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढू लागल्याने सर्वसामान्यांना जगणे असह्या होऊ लागले आहे. कडधान्य, डाळी, भाजीपाल्याचे दर वाढत असल्याने खायचे तरी काय? असा प्रश्नदेखील पडू लागला आहे. भाजीपाला दरात वाढ झाल्याने मेस, हॉटेल, धाबा, खानावळी आणि इतर व्यावसायिकांवरही परिणाम होऊ लागला आहे.









