सिमेंट बॅग 340 ते 350 रुपये : बांधकाम क्षेत्रावर परिणाम
बेळगाव : मागील काही दिवसांपासून बांधकाम साहित्य दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर याचा परिणाम होऊ लागला आहे. विशेषत: घरकुलांची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या कुटुंबीयांना याचा फटका बसू लागला आहे. लोखंड, सिमेंट, विटा दरात भरमसाट वाढ झाली आहे. इंधन, गॅस आणि दैनंदिन साहित्याच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा चटका सहन करावा लागत आहे. त्यातच घरकुलाचे स्वप्न बघणाऱ्या कुटुंबीयांनादेखील महागाईचा चटका बसत आहे. बांधकाम साहित्य दरात वाढ झाली आहे. लोखंड, सिमेंट, खडी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना नवीन घर नको रे बाबा… म्हणण्याची वेळ आली आहे. एक हजार चौरस फूट घर बांधकामासाठी 15 लाख रुपयांपर्यंत खर्च येत होता. तो आता 20 ते 25 लाखांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न स्वप्नच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रशिया, युक्रेन युद्धादरम्यान लोखंडाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. त्यानंतर लोखंडाच्या किमती काहीशा कमी झाल्या. मात्र, सध्या लोखंडाच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्याचबरोबर सिमेंटच्या दरात 10 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सिमेंट 340 ते 350 रुपये प्रति पिशवी झाले आहे. शिवाय गवंडी, सेंट्रिंग मजुरीतदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण घर बांधकामासाठी बजेट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हॉटेल, घर, फ्लॅट आणि इतर बांधकामासाठी लोखंड, वाळू, विटा, सिमेंट, खडी, चिरे आदींची आवश्यकता असते. मात्र, यातील काही साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे घराचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांसमोर अडचणी वाढल्या आहेत.









