विविध मार्गावर जादा बस : महिलांचा मोफत प्रवास : लांबपल्ल्याच्या प्रवाशांची गैरसोय दूर
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषत: बाहेरून मूळगावी परतणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक आणि इतर बसथांब्यावर प्रवासी संख्या अधिक दिसत आहे. दरम्यान, परिवहनने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध मार्गावर जादा बसची सोय केली आहे. शनिवार आणि रविवार सुटी असल्याने मुंबई, गोवा, पुणे, बेंगळूर येथून परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली होती. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूळगावी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. त्यामुळे विविध मार्गावर बसेसला देखील गर्दी होऊ लागली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. राज्यात शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत बसप्रवास दिला जात आहे. त्यामुळे महिलांचा प्रवास सुखकर झाला आहे. विशेषत: परिवहनच्या बसना प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामध्ये महिलांचा सहभाग अधिक आहे. गणेशोत्सव काळासाठी परिवहन मंडळाने जादा बसची सुविधा उपलब्ध केली आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, बेंगळूर, म्हैसूर आदी ठिकाणी 60 हून अधिक बसेस धावत आहेत. त्यामुळे लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. मुंबई, पुणे, गोवा येथून कुटुंबासह गावी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिवहनबरोबर खासगी वाहनांनादेखील प्रवासी वाढू लागले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव परिवहनला आणि खासगी बसेसना उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून दिलासादायक ठरणार आहे.
आवश्यकतेनुसार बसफेऱ्या वाढविणार
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, बेंगळूर, हैद्राबाद, गोवा आदी ठिकाणी जादा बस सोडण्यात आल्या आहेत. शिवाय आवश्यकतेनुसार पुन्हा बसफेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. त्याबरोबर गणेशोत्सव काळात शहरांतर्गत बससेवेत देखील वाढ केली जाणार आहे.
– ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)









