बेंगळूर-दिल्ली फेऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागल्याने प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ
बेळगाव : बेळगावमधून विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डिसेंबर 2023 मध्ये तब्बल 35,232 प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाने केली आहे. बेंगळूर व दिल्ली या दोन्ही फेऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागल्याने विमान प्रवाशांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यातच डिसेंबर महिन्यात झालेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. सांबरा येथील बेळगाव विमानतळावरून सध्या दिल्ली, बेंगळूर, मुंबई, हैद्राबाद, अहमदाबाद, नागपूर, सुरत, जोधपूर, जयपूर व तिरुपती या दहा शहरांना विमानसेवा सुरू आहे. बेंगळूरला दररोज दोन विमाने असल्याने प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यातच डिसेंबरअखेर इंडिगो एअरलाईन्सने आणखी एक फेरी काही दिवसांसाठी सुरू केली होती.
दोन मेट्रिक टन कार्गो वाहतूक
डिसेंबर महिन्यात 591 विमानांची बेळगावला ये-जा होती. त्यामुळे 35,232 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. मागील वर्षभराच्या तुलनेत डिसेंबरमध्ये प्रवासी संख्या सर्वाधिक होती. डिसेंबर महिन्यात दोन आठवडे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. यामुळे प्रशासकीय अधिकारी, आमदार, मंत्री यांची विमानाने ये-जा होती. त्यामुळे या महिन्यात प्रवासी संख्या वाढल्याचे दिसून आले. तर दोन मेट्रिक टन कार्गो वाहतूक करण्यात आली आहे.
केएमव्ही कंपनीला मिळणार कंत्राट
विमानतळाच्या टर्मिनल तसेच इतर बांधकामाच्या कंत्राटासाठी मागील महिन्यात निविदा काढण्यात आल्या होत्या. देशभरातील नामवंत कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला. यामध्ये केएमव्ही प्रोजेक्ट या कंपनीने 220 कोटी रुपयांच्या निविदा भरल्या. इतर कंपन्यांच्या तुलनेत केएमव्ही कमी किमतीच्या निविदा भरल्याने त्यांनाच या कामाचे कंत्राट मिळणार असल्याची चिन्हे आहेत.
बेळगाव-दिल्ली विमानफेरी पूर्ववत
प्रजासत्ताक दिनासाठी दिल्ली येथे कवायती सुरू होत्या. त्यामुळे विमानांचा व्यत्यय येऊ नये, यासाठी मागील आठवड्यात बेळगाव-दिल्ली विमानफेरी रद्द करण्यात आली होती. आठवडाभरानंतर शनिवार दि. 27 पासून बेळगाव-दिल्ली विमानफेरी पूर्ववत करण्यात आली आहे. प्रवाशांनी पुन्हा एकदा या मार्गावर प्रवास सुरू करावा, असे आवाहन बेळगाव विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी केले आहे.









