आठ दिवसात दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा
बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीकडे देण्यात आली. परंतु, या कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. काकतीवेस येथे सात ते आठ महिन्यांपूर्वी खोदाई करण्यात आलेला खड्डा अद्यापही तसाच असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. उतारावरून येणारी वाहने वेगाने येत असल्यामुळे खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात वाहने इतरत्र वळविताना अपघात होत असल्याने हा खड्डा येत्या आठ दिवसात बुजवला नाही तर आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. काकतीवेस येथे जलवाहिनीला गळती लागल्याने सात ते आठ महिन्यांपूर्वी एलअँडटी कंपनीकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले. गळती लागण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच रस्ता करण्यात आला होता. दुरुस्तीचे काम केल्यानंतर काही दिवस बॅरिकेड्स लावण्यात आले होते. खणण्यात आलेली माती बसावी, या उद्देशाने खड्डा बुजविण्यात आला नव्हता. परंतु, त्यानंतर मात्र अनेक महिने उलटले तरी खड्डायावर डांबरीकरण करण्यात आलेले नाही. याबाबत स्थानिकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनदेखील त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. काकतीवेस येथील उतारावरून भरधाव वेगाने वाहने येतात. दररोज शेकडो वाहनांची या रस्त्यावरून ये-जा करत असल्याने खड्डा चुकविण्याच्या नादात रस्त्याशेजारून जाणारे पादचारी अथवा दुसऱ्या वाहनचालकांना वाहने धडकण्याचे प्रकार घडत आहेत. रात्रीच्यावेळी तर खड्डा दृष्टीस न पडल्याने अनेक दुचाकीचालकांना अपघात घडले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा काकतीवेस येथील व्यापारी व नागरिकांनी दिला आहे.
कंपनी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष- गणेश काळे, नागरिक
एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा कळवून देखील त्यांच्याकडून थातुरमातूर उत्तरे दिली जातात. दोन दिवसातून एकदा तरी या ठिकाणी अपघात होत आहेत. स्थानिक युवक मंडळाने या ख•dयामध्ये माती भरून अपघात रोखण्याचा प्रयत्न केला. येत्या आठ दिवसात रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास रास्ता रोको करण्यात येईल.









