केंद्रीय मंत्रिमडळाकडून 6 टक्क्यांची वाढ : आता 5,650 रुपये प्रतिक्विंटल दर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवार, 22 जानेवारी रोजी 2025-26 च्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागासाठी (ज्यूट) 5,650 रुपये प्रतिक्विंटल किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मंजूर केली. केंद्र सरकारने जाहीर केलेला हा दर मागील किमान आधारभूत किंमतीपेक्षा 6 टक्के किंवा 315 रुपयांनी जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली.
2025-26 हंगामासाठी कच्च्या तागाचा (टीडी-3 ग्रेड) किमान आधारभूत किंमत 5,650 रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आली आहे. सुधारित एमएसपीमुळे अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चापेक्षा 66.8 टक्के परतावा मिळाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. सरकारने 2014-15 मध्ये कच्च्या तागाचा किमान आधारभूत किमती 2,400 रुपये प्रतिक्विंटलवरून 2025-26 च्या विपणन हंगामासाठी 5,650 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढवली आहे.
2025-26 च्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागाचा मंजूर केलेला किमान आधारभूत किंमत हा 2018-19 च्या अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केलेल्या अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याच्या तत्त्वाशी सुसंगत आहे. 2025-26 च्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागाचा किमान आधारभूत किंमत मागील 2024-25 च्या विपणन हंगामापेक्षा 315 रुपये प्रतिक्विंटल जास्त आहे.
2014-15 ते 2024-25 या कालावधीत ताग उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आलेला किमान आधारभूत किमतीचा निधी 1,300 कोटी रुपये होता, तर 2004-05 ते 2013-14 या कालावधीत देण्यात आलेला किमान आधारभूत किमतीचा निधी 441 कोटी रुपये होता. 40 लाख शेतकरी कुटुंबांचे जीवनमान प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ताग उद्योगावर अवलंबून आहे. ताग मिल आणि ताग व्यापारात सुमारे 4 लाख कामगारांना थेट रोजगार मिळतो. गेल्यावर्षी 1 लाख 70 हजार शेतकऱ्यांकडून ताग खरेदी करण्यात आला होता. 82 टक्के ताग उत्पादक पश्चिम बंगालमधील आहेत, तर उर्वरित आसाम आणि बिहारमधील ताग उत्पादनात 9-9 टक्के वाटा आहे.









