कुशल कामगाराला रु. 528, तर अकुशलसाठी रु. 473
पणजी : मजूर आयुक्तांनी जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार आता राज्यातील कामगारांच्या किमान वेतनात 100 रु. नी सरासरी वाढ केली आहे. त्यानुसार आता कुशल कामगारांसाठी किमान वेतन रु. 523 ते रु. 528 झालेले आहे, तर अकुशल कामगारांसाठी किमान वेतन रु. 473 राहिल. किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण गोव्याचे दोन विभाग आहेत. त्यातील झोन ए मध्ये पणजी महापालिका क्षेत्र, व राज्यातील सर्व पालिका क्षेत्रे येतात. झोन बी मध्ये कासावली, असोळणा, कोलवा, कोलवाळ, बागा, कळंगूट, हणजूण, वागातोर, मोरजी, बाणावली, माजोर्डा, मोबोर, चोपडे, मांद्रे, हरमल व केळशी यांचा समावेश केलेला आहे. झोन सी मध्ये उर्वरित सर्व क्षेत्राला आणले आहे. कुशल क्षेत्रात फार्मासिस्ट, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, वायरमन, फोरमन, मॅकानिक, पेंटर, पेस्ट्रिमन, संगणक ऑपरेटर, पेट्रोल पंपावरील ऑपरेटर्स इत्यांदींचा समावेश आहे. यामध्ये एकूण 37 विविध क्षेत्रांचा समावेश आहे. अकुशल कामगार क्षेत्रात फिटर, मॅकानिक, कारपेंटर, वेल्डर, टेलर्स, कुशन मेकर, धोबी, इस्त्राr करणारे, पॉलीश करणारे, बेकरी कामगार, केशकर्तनालयातील कामगार इत्यादी अनेकांचा समावेश केला आहे. कारकून, अकाऊंटंट, स्टेनो, क्लर्क, स्टोअर क्लार्क, टापपिस्ट, रिसेप्शनिस्ट, इत्यादी अनेकांचा समावेश आहे. चौकीदार, शिपाई, मजूर, सफाईकामगार, पॅकिंग करणारे, ऑफिस बॉय, वॉचमन, वृत्तपत्राचे वितरण करणारा यांचे वेतन दिवसासाठी किमान 412 निश्चित केले आहे. हॉटेल्समधील कुक, आचारी, उस्ताद, बावर्ची मॅनेजर, अकाऊंटंट, टेलिफोन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, हाऊस किपर, मुख्य वेटर, सुपरवायझर यांना आता दिवसाकाठी 525 ते 528 रुपये वेतन निश्चित केले आहे. सरकारने 2022 मध्ये अधिसूचना काढून जनतेच्या हरकती व सूचना मागविल्या होत्या. जनतेने केलेल्या सूचना व राज्य समितीने केलेल्या शिफारसीनुसार सरकाने हा निर्णय घेतला आहे.









