महाराष्ट्रातील दूध संघांचा निर्णय, उत्पादकांना दिलासा
बेळगाव : गोकुळ दूध संघाने गतवर्षी सीमाभागातील कमी केलेले दुधाचे दर पुन्हा वाढविले आहेत. त्यामुळे सीमाभागातील दूध उत्पादक पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हैस दूध दर प्रतिलिटर 4 रुपये तर गाय दुधास प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. दूध दर कमी केल्यानंतर सीमाभागातील पशुपालकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाला वर्षभरानंतर यश आले आहे. वाढीव दूध दराचे परिपत्रक सीमाभागातील दूध संकलन करणाऱ्या संस्थांना पाठविण्यात आले आहे. गतवर्षी महाराष्ट्रातील दूध संघांनी आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील 1 फेब्रुवारी 2024 पासून म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर 3 तर गायीच्या दूध दरात 4 रुपये कपात केली होती.
दरम्यान महाराष्ट्रातील दूध खरेदीचा दर जैसे थे कायम ठेवला होता. दरम्यान सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेऊन महाराष्ट्रातील दुधाप्रमाणेच सीमाभागातील दूध उत्पादकांना दर देण्यात यावा, अशी मागणी करत आंदोलन छेडले हेते. या वाढीव दरानुसार संघांकडून 6.5 फॅट व 9 एसएनएफसाठी म्हैस दुधाला 50.80 वरून 54.80 रुपये प्रतिलिटर दर मिळणार आहे. सीमाभागातून महाराष्ट्रातील दूध संघांना दररोज तीन ते साडेतीन लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. इतका दर्जेदार दुधाचा पुरवठा होऊनही महाराष्ट्रातील दूध संघाकडून उत्पादकांवर अन्याय केला जात होता. आता दूध संघांनी सीमाभागातील दूध उत्पादकांना वाढीव दर देण्याचा निर्णय घेतल्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.









