सर्वोच्च न्यायालयाकडून 21 ऑगस्टपर्यंत दिलासा
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलेल्या अंतरिम जामिनाची मुदत 21 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने 26 मे रोजी सत्येंद्र जैन यांना 6 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. ही मुदत संपल्यानंतर आता पुन्हा त्यांना 21 ऑगस्टपर्यंत दिलासा देण्यात आला आहे.
सत्येंद्र जैन यांच्यावर 22 जुलै रोजी दिल्लीच्या एका खासगी रुग्णालयात मणक्याची शस्त्रक्रिया झाली. जैन यांना तीन प्रमुख रु ग्णालयांनी पाठीच्या गंभीर शस्त्रक्रियेसाठी शिफारस केली होती. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी जैन यांच्यावर इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. न्यायालयीन सुनावणीवेळी जैन यांच्यावतीने हजर झालेल्या वकिलांकडून जीबी पंत, मॅक्स आणि अपोलो रुग्णालयांचे अहवाल न्यायालयासमोर ठेवण्यात आले. त्यानंतर आता त्यांच्या वैद्यकीय उपचार व विश्रांतीसाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.









