2023-24 साठी 8.25 टक्के व्याजदर निश्चित : 6 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजरात वाढ करण्यात आली आहे. पीएफवरील व्याजदर 8.25 टक्के निश्चित करण्यात आला आहे. कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने शनिवारी 235 व्या मंडळ बैठकीत प्रस्तावित व्याजदराला मंजुरी दिली आहे. याचा फायदा देशभरातील सहा कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेला 8.25 टक्के हा व्याजदर मागील तीन वर्षांतील सर्वोच्च व्याजदर आहे. 2021-22 मध्ये ईपीएफवरील व्याजदर 8.10 टक्क्मयांपर्यंत खाली आणण्यात आला होता. हा दर गेल्या चार दशकातील सर्वात कमी व्याजदर होता. त्यानंतर मार्च 2023 मध्ये 2022-23 साठी ईपीएफवरील व्याजदर 8.15 टक्के जाहीर केला होता. आता त्यात 0.10 टक्क्यांनी वाढ केल्याने कोट्यावधी कर्मचाऱ्यांना चालू वर्षात वाढीव दराने व्याज जमा होणार आहे.
व्याजदर संमतीसाठी अर्थ मंत्रालयाकडे
दरम्यान, 2023-24 साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर संमतीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. सदर प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर 6 कोटींहून अधिक ग्राहकांच्या खात्यात व्याज जमा केले जाईल. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर व्याजदराची अंमलबजावणी होते. यापूर्वी मार्च 2020 मध्ये भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 2018-19 साठी 8.65 टक्क्मयांवरून 2019-20 साठी 8.50 टक्के या सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणले होते.
वीस किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमधील पगारदार कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योगदान अनिवार्य आहे. या अंतर्गत, कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम मासिक आधारावर ईपीएफ खात्यात जमा केली जाते. तेवढेच योगदान नियोक्त्याद्वारे केले जाते. नियोक्त्याच्या वाट्यापैकी 3.67 टक्के रक्कम ईपीएफ खात्यात आणि उर्वरित 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत (ईपीएस) जमा केली जाते.
सध्याच्या काळात देशभरात मोठ्या प्रमाणात कर्मचारी ईपीएफओ सदस्य आहेत. सदर कर्मचारी आपल्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक रक्कम घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकतात. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाईट किंवा आपल्या मोबाईल फोनवरून एसएमएस पाठवून देखील पीएफ खातेदार आपली रक्कम जाणून घेऊ शकतो.









