पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन, विकासाची फळे तळागाळापर्यंत पोहचविण्याची प्रक्रिया सुरुच
वृत्तसंस्था ~ गांधीनगर
सध्याच्या आर्थिक वर्षातील प्रथम सहा महिन्यांमध्ये भारताचा आर्थिक विकासदर 7.7 टक्के राहिला आहे. इतका विकासदर जगातील कोणत्याही देशाचा नाही. भारताने मात्र, तो गाठण्यात यश मिळविले आहे, हे केंद्र सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या धोरणांचे यश आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते गुजरातची राजधानी गांधीनगर येथे ‘इन्फिनिटी फोरम 2.0’ या कार्यक्रमात शनिवारी बोलत होते. त्यात त्यांनी अर्थविषयक विविध विषयांना स्पर्श केला.
येत्या काही वर्षांमध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. तसेच, 2047 पर्यंत भारत एक विकसीत राष्ट्र म्हणून प्रसिद्धीस येईल. आज जगातील सर्व राष्ट्रांच्या अपेक्षा भारतावर खिळलेल्या आहेत. भारत हे जगाचे नवे आशास्थान आहे. हे अपोआप घडलेले नाही. केंद्र सरकारने आपल्या धोरणांमुळे घडवून आणलेले आर्थिक परिवर्तन हे याचे कारण आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये अर्थव्यवस्था विकसीत करण्यासाठी केंद्र सरकारने विविध सुधारणावादी धोरणे लागू केली आहेत. त्यांचा हा परिणाम आहे. कोरोना काळात जेव्हा मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थाही लडखडत होत्या, तेव्हा भारताने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम लागू केला होता. जेव्हा मोठ्या अर्थव्यवस्था केवळ आर्थिक आणि वित्तीय दिलासा देण्यावर भर देत होत्या, तेव्हा आम्ही दीर्घकालीन विकासाच्या दिशेने पावले टाकत होतो आणि तशा प्रकारची धोरणे क्रियान्वित करीत होतो, याचा मला अभिमान आहे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
सुधारणांमुळे पाया भक्कम
केंद्र सरकारच्या सुनियोजित आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम झाला आहे. भारतामुळे यंदा जगाच्या अर्थिक प्रगतीत सुधारणा होईल, असे अनुमान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून व्यक्त करण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की, आज भारत जगाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनण्याच्या स्थितीत आहे. सध्याच्या आव्हानात्मक जागतिक अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीत जागतिक बँकेनेही भारत हेच आशास्थान असल्याचे स्पष्ट केले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारताचा वेग सर्वाधिक
आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होत आहे. आर्थिक सेवाक्षेत्रात होत असलेली भारताची वाढ तर जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. विदेशी गुंतवणूक आणि विदेशी चलन साठा यांच्यात मोठी वाढ होत आहे. बँकिंग क्षेत्राची स्थिती कधी नव्हे, इतकी सुधारली असून त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे. परिणामी आता आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यकाळ उज्ज्वल दिसत आहे, अशी भलावण त्यांनी त्यांच्या भाषणात केली.
आगामी काळ अधिक लाभदायक
यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर अपेक्षेपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताच्या विकासदराचे सुधारित अनुमान घोषित केले आहे. आयात, निर्यात, उत्पादन आणि सेवाक्षेत्रात अपेक्षेपक्षा अधिक वाढ होत असून याचा परिणाम नवे रोजगार निर्माण होण्यात झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक गैरव्यवहारांवरही नियंत्रण आणण्यात यश आले असून त्यामुळे स्थिती समाधानकारक आहे असे मत अनेक तज्ञांनीही व्यक्त केले आहे. रिझर्व्ह बँकेनेही विकासदरासंबंधी सकारात्मक अनुमान व्यक्त केले आहे.
महागाईनियंत्रणाचे आव्हान
देशाचा आर्थिक विकास वेगाने होत आहे, हे स्पष्ट आहे. मात्र, केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांना आगामी काळात महागाईच्या आव्हानाशी दोन हात करायचे आहेत. महागाई दर नियंत्रणात राहिल्यास आर्थिक प्रगतीची फळे तळागाळापर्यंत पोहचविणे अधिक प्रमाणात शक्य होणार आहे. यासाठी सामाजिक योजनांवर सढळ हाताने खर्च करण्याची आवश्यकता असल्याचे मत गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अर्थतज्ञांनीही विविध कार्यक्रमांमधून व्यक्त केले आहे.









