पुजाऱयावर हल्ला करणाऱयांना अद्दल घडवण्याची मागणी : हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा पुन्हा इशारा
प्रतिनिधी /वास्को
बायणा किनाऱयावर गुंड प्रवृत्तीचा उपद्रव वाढत असून पोलिसांनी या किनाऱयावर गस्त ठेवावी. मंदिरात पुजारी अणि त्यांच्या सेवेकऱयांवर हल्ला होण्याची घटना पुन्हा घडू नये असे वाटत असल्यास पोलिसांनी यात गुंतलेल्या गुन्हेगारांना अद्दल घडवावी. या कारवाईतून गोवाभर संदेश पोहोचेल व मंदिरातील पुजाऱयांवर हात घालण्याचे धैर्य कुणी करणार नाही. त्यामुळे पोलिसांनी त्वरित कृती करावी, असे आवाहन हिंदू धर्माभिमानी नागरिकांनी केले आहे.
बायणा किनाऱयावरील हनुमान मंदिरातील पुजाऱयासह त्यांच्या चौघा सेवेकऱयांना शुक्रवारी मध्यरात्री सुमारे पंधरा जणांच्या टोळीकडून मारहाण झाली होती. या प्रकरणी मुरगाव पोलिसांनी सागर उड्डीगीर, नागराज मदार, हरीयप्पा दोडामणी, नागेश तलवार अशा चौघा युवकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली व जामीनावर मुक्त केले. मात्र, या कारवाईने हिंदू धर्माभिमानी कार्यकर्त्यांचे समाधान झालेले नाही. त्यांनी रविवारी दुपारी मुरगाव पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांची भेट घेऊन संशयित गुन्हेगारांविरुद्ध दखलपात्र गुन्हे नोंद करून त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासारखी कडक कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र, ही मागणी करून चोवीस तास उलटले तरी पोलिसांनी कोणतीही कृती केलेली नाही. त्या युवकांविरुद्ध अधिक कारवाई करू नये यासाठी पोलिसांवर बाहेरून दबाव येत असावा संशय धर्माभिमांनी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यासंबंधी बायणा किनाऱयावरील मंदिरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यकर्त्यांनी पोलिसांना पुन्हा इशारा दिला आहे. घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केला. कारवाई न झाल्यास पुढील कृती ठरविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे श्याम नाईक, संजीव कोरगावकर, जयंत जाधव, मंदिराचे पुजारी दत्तप्रसाद भट उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी व भट यांनी शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती दिली. त्या रात्री पंधरा ते वीस युवकांचा गट होता. तो नशेत होता. त्यांनी केलेल्या मारहाणीत दोघांना जबर दुखापत झालेली आहे. या घटनेची पोलीस तक्रार करायला रात्री गेलेल्या पुजारी आणि इतरांना सकाळी चार वाजेपर्यंत पोलीस स्थानकात तिष्ठत ठेवण्यात आले होते. तक्रार घेतल्यानंतरही कारवाई झाली नाही. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आवाज उठवताच रविवारी सकाळी अटक व सुटका झाली. विशेष म्हणजे मंदिरात झालेल्या मारहाणीविषयी पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांनाही काहीही माहीत नव्हते असे सांगून या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत आश्चर्य व्यक्त केले.
बायणा किनाऱयावर वाढत्या संख्येने लोक येत आहेत. या ठिकाणी सर्व काही सुरळीत चाललेले असताना काही गुंड प्रवृतीचे युवक उपद्रव निर्माण करीत असतात. नशाबाजी करीत असतात. यासंबंधी पोलिसांशी वारंवार संपर्क साधून तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, पोलिसांनी दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळेच पुजाऱयासह सेवेकऱयांना मारहाण करण्यापर्यंत त्या गुंडप्रवृतीची मजलही गेली आहे. ही प्रवृत्ती वेळीच ठेचण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या घटना गोव्यात कुठेच पुन्हा घडू नयेत यासाठी त्या युवकांविरुद्ध दखलपात्र कारवाई व्हायला हवी. योग्य संदेश लोकांपर्यंत पोहोचायला हवा. त्यामुळे पुन्हा कुणाला मंदिरात पुजाऱयांवर हात घालण्याचे धैर्य होणार नाही असे स्पष्ट करून ही कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा पुढील कृती निश्चित करू, असा इशारा उपस्थित कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेनेही या घटनेचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे निषेध केला आहे. तसेच गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे. गोवा प्रदेश पुरोहित ब्राह्मण संघानेही या घटनेचा निषेध करीत गुन्हेगारांविरुद्ध कारवाईची मागणी मुरगाव पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.









