वृत्तसंस्था/ पॅरिस
प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रामध्ये चार ग्रँडस्लॅम स्पर्धा भरविल्या जातात. त्यापैकी पॅरिसमधील फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा प्रतिष्ठेची समजली जाते. 2023 च्या टेनिस हंगामातील फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा येथे 28 मे ते 11 जून दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धा आयोजकांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत विजेत्यांना देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 च्या तुलनेत यावर्षी सदर स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस रकमेत 12.3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा रेड क्लेकोर्टवर खेळवली जाते. 2023 च्या फ्रेंच गँडस्लॅम स्पर्धेत विजेत्यांसाठी एकूण बक्षीसाची रक्कम 49.6 दशलक्ष युरोस (54.6 दशलक्ष डॉलर्स) राहिल. या स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्यांच्या बक्षीस रकमेत गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.1 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुरुष आणि महिलांच्या दुहेरीतील विजेत्यांसाठी बक्षीस रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.









