27 रु. दर निश्चित : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : राज्यात 188 नवे कॅन्टीन सुरू करणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजप सरकारच्या काळात दुर्लक्ष झालेल्या इंदिरा कॅन्टीनला काँग्रेस सरकारने पुन्हा संजीवनी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तेथील खाद्यपदार्थांच्या मेनूमध्ये बदल केला जात आहे. दरम्यान, बेंगळूर वगळता राज्यभरात 188 नवी इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहेत. परंतु, तेथील खाद्यपदार्थांचा दर 27 रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी बेंगळूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी 188 नवे इंदिरा कॅन्टीन सुरू करण्याचा आणि तेथील खाद्यपदार्थांचा दर 27 रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी सिद्धरामय्या यांचे सरकार असताना शहरी भागात कामासाठी येणारे रस्त्यावरील फेरीवाले, गरीब, मजुरांना अनुकूल व्हावे, यासाठी राज्यात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आले होते. मात्र, अनुदानाअभावी मागील भाजप सरकारच्या काळात इंदिरा कॅन्टीनकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर असून या कॅन्टीनना सुविधा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेंगळूर वगळता इतरत्र नवी कॅन्टीन सुरू करण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदिल दाखविला आहे. कायदा आणि संसदीय कामकाजमंत्री एच. के. पाटील यांनी याविषयी माहिती दिली. इंदिरा कॅन्टीनमधील भोजनाचा दर 60 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. मात्र, ग्राहकांकडून 27 रुपये आकारले जाणार आहेत. उर्वरित 33 रुपये सबसिडी सरकार देणार आहे. बेंगळूरमधील कॅन्टीनमध्ये जुने दरच कायम राहणार आहे. तसेच नवे कॅन्टीन सुरू करण्यासाठी 27 कोटी रु. अनुदान देण्यास संमती दर्शविण्यात आली आहे.
इतर महत्त्वाचे निर्णय…
राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता वृद्धी कार्यक्रमासाठी 78.13 कोटी रु. अनुदान दिले जाणार आहे. कोडगू वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेल निर्मितीसाठी 27 कोटी रु., गदग वैद्यकीय महाविद्यालय आवारात इस्पितळ निर्मितीसाठी 135 कोटी रु. मंजुरीला मंत्रिमंडळ बैठकीत संमती दर्शविण्यात आली. कावेरी नदीच्या पाणीवाटपासंबंधी सोमवारी वस्तूस्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे.









