पारंपरिक शेतीसह फुलांच्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल
बेळगाव : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शेतकरी फुल शेती करण्याकडे वळले आहेत. भाजी आणि फळ झाडांसह मिश्र पीक म्हणून फुलांची शेती करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. सर्व हंगामात फुल शेती केली जात असल्याने बाजारपेठेत फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र योग्य नियोजन आणि दर मिळत नसल्याने फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात 1290.89 हेक्टरमध्ये जाई, झेंडू, ऑस्टर, शेवंती, जास्मीन, गुलाब, कॅलाकिल्ली, कार्नशन आदी प्रकारची फुल शेती केली आहे. या माध्यमातून 12,518.52 मेट्रिक टन फुलांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र फुलांच्या विक्रीसाठी योग्य बाजारपेठेची व्यवस्था नसल्याने दररोज मोठ्या प्रमाणात फुलांचे नुकसान होत आहे.
बेंगळूर, पणजी, मुंबई, हैदराबाद, म्हैसूर, चेन्नई व इतर शहरांना बेळगावातून फुलांचा पुरवठा केला जातो. चिकोडी, बेळगाव, रामदुर्ग, सौंदत्ती आणि रायबाग तालुक्यात घतलेली फुले व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दररोज गोवा, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशात पाठविली जातात. शहरातील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गानजीकच्या बुडा कार्यालयाजवळ 2 कोटी खर्ची घालून बांधलेल्या फुल मार्केटमुळे फुलांचा व्यापार वाढला आहे. दिवाळी, दसरा, गुढी पाडवा आदी सणांच्या काळात दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. त्याचबरोबर किरकोळ बाजारात शेतकरी फुलांची विक्री करून लाखो रुपये कमवत आहेत. मात्र फुलांना योग्य भाव मिळत नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.









