भारतीय हॉकीच्या 100 वर्षांनिमित्त 7 नोव्हेंबर रोजी देशव्यापी महोत्सव
वृत्तसंस्था/ महाबलीपूरम
हॉकी इंडियाने 15 व्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रीय आणि तळागाळातील स्पर्धांच्या आयोजनाला पाठिंबा देण्यासाठी आर्थिक अनुदानात मोठी वाढ जाहीर केली आहे. आता वरिष्ठ पुऊष आणि वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रत्येकी 70 लाख ऊपये, कनिष्ठ पुऊष, कनिष्ठ महिला, उपकनिष्ठ पुऊष आणि उपकनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रत्येकी 30 लाख ऊपयांचे वाटप केले जाईल.
याशिवाय, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक राज्याला 25 लाख ऊपये दिले जातील. या वाढीव अनुदानांचा उद्देश पायाभूत सुविधा मजबूत करणे, उपक्रमांची गुणवत्ता सुधारणे आणि स्थानिक पातळीवर आर्थिक अडचणी कमी करून व्यापक सहभाग सुनिश्चित करणे हा आहे, असे हॉकी इंडियाने रविवारी म्हटले आहे.
या मदतीचा फायदा हजारो उदयोन्मुख खेळाडू, प्रशिक्षक आणि तळागाळातील अधिकाऱ्यांना होईल अशी अपेक्षा आहे, जे भारतीय हॉकीच्या भविष्याचा कणा आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय हॉकीच्या 100 वर्षांच्या प्रवासाचे औचित्य साधून 7 नोव्हेंबर रोजी देशभरात होणाऱ्या महोत्सवासह अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्या. सदर मोलाचा टप्पा साजरा करण्यासाठी हॉकी इंडिया देशव्यापी महोत्सवाचे आयोजन करणार आहे, ज्यामध्ये देशातील प्रत्येक जिह्यात अशा प्रकारे एकाच वेळी 1,000 सामने खेळविले जातील. यात 18,000 पुऊष आणि 18,000 महिला खेळाडू सहभागी होतील. अशा प्रकारे दोन्ही संघांतून मिळून 36,000 हून अधिक खेळाडूंना सहभागी करून घेण्यात येईल.
या उपक्रमामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू एकत्र येतील. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की म्हणाले की, भारतीय हॉकीची 100 वर्षे साजरी करत असताना आम्ही केवळ आमच्या सोनेरी वारशाचा सन्मान करत नाही, तर भविष्यासाठी एक मजबूत पाया देखील रचत आहोत. हा राष्ट्रीय महोत्सव म्हणजे भारतीय हॉकीला पुढे नेलेल्या प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्याला आमची मानवंदना आहे. आम्ही जाहीर केलेली आर्थिक मदत ही पुढील पिढीच्या स्वप्नांमध्ये थेट गुंतवणूक आहे. त्यामुळे संसाधनांच्या कमतरतेमुळे कोणतीही प्रतिभा मागे राहणार नाही याची खात्री होईल, असेही त्यांनी सांगितले.









