ऐतिहासिक संदर्भात व परंपरागतरित्या उत्पादन क्षेत्र हे पुरुष उमेदवारांचा प्रभाव असणारे समजले जात असे. मात्र बदलती परिस्थिती उपलब्ध कौशल्यप्राप्त कर्मचाऱ्यांचे प्रमाण व त्यांची टक्केवारी व व्यावसायिक स्पर्धेसह कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेसाठी विविध कंपन्यांनी विविध प्रकारच्या पुढाकारांसह गेल्या काही वर्षात प्रयत्न सुरु केले असून त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत.
भारतीय उत्पादन कंपन्यांमध्ये आघाडीवर असणाऱ्या व मोठ्या संख्येत कर्मचाऱ्यांची नेमणूक करणाऱ्या लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, महिंद्रा उद्योग समूह, सिएट टायर्स व हनीवेल या आणि यासारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊन विशेष प्रयत्न सुरु ठेवले आहेत. वानगीदाखल सांगायचे झाल्यास वरील कंपन्यांसह विविध कंपन्यांनी त्यांच्याकडे सध्या असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या कायम ठेवत असतानाच बदलती स्थिती, गरजा आणि व्यावसायिक कामकाज या साऱ्याला पूरक अशी भूमिका घेऊन महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने महिला कर्मचाऱ्यांच्या तान्ह्या वा लहान मुलांसाठी पाळणाघर व अशा लहान मुलांची कामाच्या ठिकाणी काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सुविधा व कर्मचारी ठेवणे, महिला कर्मचाऱ्यांसाठी लवचिक व सोयीस्कर कामाचे तास ठेवणे, यासंदर्भातील गरजू महिलांना बाळांचे आरोग्य, संगोपन, बालकांचे खानपान, स्वत:सह बाळांची निगा राखणे इ. साठी आवश्यक ते मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध करून दिला जातो. हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी तेथील महिला कर्मचाऱ्यांना अधिक प्रमाण वा संख्येमध्ये घेण्यासाठी नव्या कर्मचाऱ्यांची निवड करताना शैक्षणिक पात्रता व योग्यतेवर आधारित स्वरुपात महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यावर भर दिला आहे. याशिवाय कंपनीत उपलब्ध असणाऱ्या जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांचे अर्ज व माहिती कंपनी व्यवस्थापनाकडे पाठविताना त्यात योग्य व पात्रताधारक महिला उमेदवारांची निवड झाल्यास अशा उमेदवारांचा संदर्भ देणाऱ्या कंपनी उमेदवाराला विशेष प्रोत्साहनपर राशी देण्यास सुरुवात केली आहे. कंपन्यांच्या या आणि अशा प्रकारच्या प्रगतीशील धोरणांमुळे या कंपन्यांमधील महिला कर्मचाऱ्यांची संख्या निश्चितपणे वाढत आहे.
सुरुवातीलाच नमूद केलेल्या कंपन्यांपैकी उत्पादन उद्योगातील प्रमुख अशा लार्सन अँड टुब्रो यासारख्या उत्पादन, प्रकल्प व्यवस्थापन, उद्योग सेवा व संगणक क्षेत्रातील उद्योगांमध्ये मोठ्या संख्येत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी गेली काही वर्षे ठरवून व योजनापूर्वक प्रयत्न केले आहेत. यासंदर्भात कंपनीच्या अध्यक्षांकडून घोषित करण्यात आलेले धोरणात्मक निर्णय व त्यांच्या अंमलबजावणीचा समावेश आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या विविध वेळी व विविध प्रकारच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने आपली धोरणे आखली आहेत. यामध्ये संबंधित गरजू महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांना विशेष कालावधीसाठी कंपनी व्यवस्थापनातर्फे विशेष सहकार्य दिले जाते. या भूमिकेचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.
लार्सन अँड टुब्रो सारख्या कंपन्या महिला कर्मचाऱ्यांना तान्ह्या मुलांना घेऊन अशा कर्मचाऱ्यांच्या कामावर ये-जा करण्यासाठी सहानुभूती व विशेष सहकार्याची भूमिका घेतात. यात एक विशेष बाब म्हणून अगदीच तान्ह्या बालकांना ठराविक काळात सोबत म्हणून त्यांच्या रोजच्या व घरगुती आयांना कंपनी वाहनात संबंधित महिला कर्मचाऱ्यांसह प्रवास करण्याची परवानगी दिली जाते. याशिवाय कंपनीतर्फे विविध ठिकाणी स्थापन केलेल्या महिला कर्मचारी कल्याण केंद्रांच्या माध्यमातून महिला कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास, त्यांच्या सर्वसाधारण वा विशेष गरजा, वैद्यकीय सल्ला, आर्थिक साक्षरता व गुंतवणूक विषयक सल्ला मार्गदर्शन इ. सोयी उपलब्ध करून दिल्या जातात.
एलअँडटीचे मुख्य मानव संसाधन विकास व्यवस्थापक सी. जयकुमार यांच्या मते एलअँडटी उद्योग समूहाच्या विविध व्यवसाय विभागात महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय स्वरुपात असल्याने त्यांच्या विविध टप्प्यातील छोट्या मोठ्या गरजांची पूर्तता करण्याचे प्रयत्न केले जातात व अशा प्रयत्नांचे फायदे महिला कर्मचारी व कंपनी व्यवस्थापन या उभयतांना होतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लार्सन अँड टुब्रोमधील सुमारे 43 टक्के महिला कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी व गरजेनुसार कंपनीच्या बाल संगोपन गृहांचा लाभ घेतात.
इतर प्रमुख कंपन्यांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास आर. पी. गोएंका उद्योग समूहांतर्गत असणाऱ्या ‘सीएट’ या प्रमुख टायर उत्पादक कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी शक्ती या विशेष उपक्रमांतर्गत विविध धोरणात्मक उपाययोजना आखल्या आहेत.
आपल्या याच उपक्रमाचा भाग म्हणून सिएट कंपनीतर्फे त्यांच्या सर्व उत्पादन केंद्रांमधील खास महिला कर्मचाऱ्यांसाठी वुमेंटरिंग हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये महिलांच्या परंपरागत स्वरुपातील वैयक्तिक कौटुंबिक व आरोग्य विषयक गरजांची पूर्तता करताना त्याही पुढे जाऊन कामाच्या ठिकाणी त्यांचा कौशल्य विकास, नवीन काम शिकणे, विशेष प्रकरणी शंका निरसन करणे, परस्पर सहकार्याची भावना विकसित करुन महिला कर्मचाऱ्यांमध्ये कामाच्या संदर्भात आत्मविश्वासासह काम करण्यास चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. कंपनीच्या या पुढाकारांचा उपयोग महिला कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांची क्षमता वाढ, अधिक जबाबदारीसह त्यांना तयार करणे इ. साठी होत आहे.
महिंद्रा उद्योग समूहाने यावर्षीच्या सुरुवातीला
‘ट्रॅक्टर ते टेक्नॉलॉजी’ या क्षेत्रात अग्रणी स्वरुपात काम करणाऱ्या महिंद्रा उद्योग समूहाने आपल्या विविध कारखाने, कार्यालय इ. ठिकाणी काम करणाऱ्या व वैयक्तिक घरगुती कारणांनी नोकरीचा राजीनामा दिलेल्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मर्यादित काळासाठी असणारी कौटुंबिक कामे पूर्ण झाली असल्यास पुन्हा कामावर येण्यासाठी आवाहन केले. कंपनीच्या या नव्या उपक्रमाला कंपनीच्या माजी महिला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लक्षणीय स्वरुपात महिंद्रा कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांची कामवापसी झाली. यातून अशा महिला कर्मचाऱ्यांना मानसिक समाधान लाभले तर कंपनी व्यवस्थापनाला अनुभवी कर्मचाऱ्यांचा लाभ झाला हे विशेष.
भारतीय उद्योगांमध्ये विशेषत: उत्पादन क्षेत्र हे प्रामुख्याने व परंपरागत स्वरुपात पुरुष प्रधान व पुरुष कर्मचाऱ्यांचे वर्चस्व असणारे मानले जायचे. मात्र गेल्या दशकात या स्थितीमध्ये मोठे परिवर्तन झालेले दिसते. उत्पादन क्षेत्रात काम करण्यासाठी महिला उमेदवार, कर्मचारी मोठ्या संख्येत पुढाकार घेत असून त्यांच्या या पुढाकाराला व्यवस्थापनांतर्फे पण सकारात्मक व उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
दत्तात्रय आंबुलकर








