ग्राहकांवर दरवाढीचा बोजा पडणार नसल्याची स्पष्टोक्ती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात प्रत्येकी प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, ग्राहकांवर या वाढीचा काहीही परिणाम होणार नसून त्यांचे दर सध्याइतकेच राहणार आहेत. सदर वाढ 8 एप्रिलपासून लागू होणार आहे, अशी माहिती पेट्रोलियम विभागाकडून सोमवारी देण्यात आली आहे. उत्पादन शुल्कातील ही वाढ पेट्रोलियम कंपन्यांकडून केंद्र सरकार वसूल करणार आहे. त्यामुळे या वाढीचा परिणाम ग्राहकांवर होणार नाही, अशी अपेक्षा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर घसरले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर प्रतिद्वंद्वी कराची घोषणा केल्याने निर्माण झालेल्या व्यापार युद्धाचा परिणाम म्हणून कच्च्या इंधन तेलाचे दर घरसले आहेत. सध्या पेट्रोलियमच्या एका बॅरलचा दर 65 डॉलर्सच्या आसपास आहे.
दरवाढ नसल्याची घोषणा
उत्पादन शुल्कात वाढ झाली असली, तरी सर्वसामान्य ग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार नाही, अशी शाश्वती सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी दिली आहे, असे प्रतिपादन पेट्रोलियम विभागाने दिल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्पादन शुल्कात वाढ झाल्याने केंद्र सरकारचे उत्पन्न मात्र, काही प्रमाणात वाढणार असल्याची माहितीही यासंदर्भात देण्यात आली आहे.









