वाढत्या उष्म्यामुळे वापर वाढल्याचे स्पष्टीकरण
बेळगाव : मागील काही दिवसात वीज बिलाच्या तक्रारी वाढत आहेत. बिलामध्ये भरमसाट वाढ होत असल्याची तक्रार शनिवारी झालेल्या तक्रार निवारण बैठकीतदेखील करण्यात आली. घरगुतीसह टेम्पररी वाढीव वीज बिल येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अधिक तर तक्रारी या बिल वाढीसंदर्भातच होत्या. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी तक्रार निवारण बैठकीचे हेस्कॉमकडून आयोजन करण्यात येते. शहरासह प्रत्येक उपकेंद्रावर बैठक घेतली. मीटरमधील नावात बदल, वाढीव वीज बिल, कनेक्शनमधील तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. सध्या गृहज्योती योजना लागू असतानाही भरमसाट वीज बिल दिले जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली. त्याचबरोबर इतर तक्रारीही मांडण्यात आल्या. उष्मा वाढत असल्याने विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे वीज बिल वाढले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हेस्कॉमने अद्याप तशी कोणतीही दरवाढ केली नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले. यावेळी हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता एम. शिंदे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.









