अग्निवीर सैन्य भरतीच्या पार्श्वभूमिवर तरुणांची धडपड
प्रतिनिधी/ बेळगाव
बिदर येथे अग्निवीर सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तरुण इच्छुकांची धडपड सुरू झाली आहे. जुन्या तहसीलदार कार्यालयातील जनस्नेही केंद्रासमोर जात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.
बिदर येथे अग्निवीर सैन्य भरतीला प्रारंभ झाला आहे. 20 डिसेंबरपर्यंत ही भरती चालणार आहे. दरम्यान, भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची गरज भासते. यामध्ये दहावी, बारावीचे मार्कलिस्ट, रहिवासी दाखला, जात-उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. यापैकी जात-उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाईलची तहसीलदार कार्यालयातून पूर्तता केली जाते. त्यामुळे जनस्नेही केंद्रावर तरुणांची गर्दी वाढत आहे.
शासकीय कामांसाठी जात-उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, सैन्य भरती आणि इतर कामांसाठीदेखील हा दाखला महत्त्वाचा आहे. अग्निवीर सैन्य भरती जवळ आल्याने इच्छुक तरुणांची कागदपत्रे जमवाजमवसाठी धडपड सुरू झाली आहे. तहसीलदार कार्यालयासह काकती, सांबरा, उचगाव आदी ठिकाणी जनस्नेही केंद्रे आहेत. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याने केंद्रे बंद राहत आहेत. त्यामुळे तरुणांची गैरसोय होत आहे. जात-उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आणि फोटो आवश्यक आहेत. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्यासाठी तरुणांची वर्दळ वाढू लागली आहे.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर सैन्य भरती होत आहे. त्यामुळे या भरती मेळाव्याला जाणाऱ्या तरुणांची संख्यादेखील अधिक आहे. भरती जवळ आल्याने आवश्यक त्या तयारीसाठी इच्छुक तरुणांची धडपड सुरू झाली आहे.









