नवीन सरकारच्या आश्वासनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी उत्सुक
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर मोफत वीज, दहा किलो धान्य, महिलांसाठी मोफत बसप्रवास, महिलांना 2000 रुपये, बेरोजगारी भत्ता देऊ, अशी आश्वासने दिली आहेत. दरम्यान काँग्रेसचे नवीन सरकारही सत्तेत आले आहे. आश्वासनांचा लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्डच्या मागणीत वाढ झाली आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे.
राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे. दरम्यान काँग्रेसने अनेक गोरगरिबांना सोयी-सुविधा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाभ घेण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. या आश्वासनांचा लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्ड सक्तीचे केले जाईल, या आशेने नवीन बीपीएल कार्डच्या मागणीत वाढ झाली आहे. आश्वासनांचा लाभ घेण्यासाठी नवीन सरकार कधी आदेश देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्डची गरज भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटक वन, ग्राम वन आणि इतर ऑनलाईन सेंटरवर नवीन बीपीएल कार्डला अर्ज करण्यासाठी नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. मात्र कोरोना आणि इतर कारणांमुळे नवीन बीपीएल कार्ड वितरणात अडचणी वाढल्या आहेत. काहीवेळा बीपीएल कार्डचे काम स्थगित केले जात आहे. त्यामुळे गरजूंना बीपीएल कार्डपासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान काँग्रेसने गोरगरीब जनतेसाठी विविध आश्वासने दिली आहेत. शिवाय सरकारदेखील सत्तेत आले आहे. त्यामुळे आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे. यासाठी लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
निवडणुकीच्या आचारसंहितेसह अन्य कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून रेशनकार्ड वितरणाचे काम बंद होते. आता नवीन रेशनकार्डसाठी अर्ज दाखल होऊ लागले आहेत. शिवाय काही अर्जदेखील प्रलंबित आहेत. त्यामुळे नवीन रेशनकार्ड वितरणाला कधी प्रारंभ होणार, हे पाहावे लागणार आहे.









