इम्रान गवंडी,कोल्हापूर
यंदाचा उन्हाळा कडकच.. सध्या उन्हाचा तडाका वाढत असताना गारवा मिळवण्यासाठी एसी, कुलर, पंखे अशा विविध उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे राज्यात विजेच्या मागणीत सुमारे 7 हजार मेगावॅटने वाढ झाली आहे. गतवर्षी एप्रिल, मे महिन्यात अधूनमधून पडणारा पाऊस व गारपीठीमुळे विजेची मागणी मर्यादित होती. यंदा पारा वाढल्याने आपसूकच विजेची मागणी वाढली आहे. वाढत्या विजेची मागणी पूर्ण करताना वीज तुटवडा नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा जिल्ह्यातील कमाल तापमान सातत्याने 39 अंश सेल्सिअसवर राहिले. त्याचा परिणाम विजेच्या मागणीवर झाला आहे. वाढत्या उष्म्यामुळे मे महिन्यात विजेची मागणी वाढली. राज्यात दोन दिवसांत दैनंदिन सरासरी मागणीत सुमारे एक हजार मेगावॅटपेक्षा जास्त मागणीत वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातही हीच स्थिती असून गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत विजेच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 2018 मध्ये 613 मेगावॅटची मागणी होती. यामध्ये वाढ होऊन 2020 मध्ये 997 तर 2022 मध्ये 851 मेगावॅट दैनंदिन सरासरीत वाढ झाली आहे.
राज्यात उन्हाळ्यात 7 हजार मेगावॅटने मागणीत वाढ
राज्यात पावसाळ्यात सरासरी दैनंदिन विजेचा वापर 16 ते 17 हजार मेगावॅट इतका होतो. उन्हाळ्यात मात्र, विजेच्या मागणीत वाढ होऊन दैनंदिन सरासरी विजेचा वापर 23 हजार मेगावॅटच्या घरात जातो. पावसाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात सरासरी 7 हजार मेगावॅटहून अधिक विजेची मागणी वाढत आहे.
विजेची टंचाई नाही
उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी एसी, कुलर आदींचा वापर वाढला आहे. मे महिन्यात वाढत्या उष्म्यामुळे सोमवारीही बऱ्याचदा वीजपुरवठा सुरू ठेवावा लागतो. उन्हाळी सुट्टी तसेच औद्योगिक व शेती कामासाठी विजेचा वापर वाढला आहे. ऑक्टोंबरपासून 6 महिने औद्योगिक काम वाढते, गुऱ्हाळ घरे, साखर कारखाने सुरू होतात. त्यामुळे या महिन्यातही विजेची मागणी वाढलेली असते. विस्तारित वीज निर्मिती प्रकल्पातून पुरेशा प्रमाणात वीज मिळत असल्याने सध्यातरी विजेची टंचाई नसल्याचे महावितरण कंपनीने सांगितले.
वीज बिल पाहून धक्का
मार्च, एप्रिल व मे महिन्यात नागरिकांकडून विजेचा वापर वाढतो. एसी, कुलर, पंखे आदी विद्युत उपकरणे जादा वेळ सुरू असल्याने विजेच्या युनिटमध्ये सरासरी वाढ झाली आहे. या महिन्यात वाढून आलेले वीज बिल पाहून ग्राहकांना धक्का बसत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.
मागील पाच वर्षात जिल्ह्यातील विजेचा दैनंदिन सरासरी वापर
मार्च 2018 – 571 मेगावॅट
मार्च 2019 – 817 मेगावॅट
मार्च 2020 – 885 मेगावॅट
मार्च 2021 – 883 मेगावॅट
मार्च 2022 – 845 मेगावॅट
एप्रिल 2018 – 618 मेगावॅट
एप्रिल 2019 – 828 मेगावॅट
एप्रिल 2020 – 559 मेगावॅट
एप्रिल 2021 – 855 मेगावॅट
एप्रिल 2022 – 852 मेगावॅट
मे 2018 – 613 मेगावॅट
मे 2019 – 987 मेगावॅट
मे 2020 – 797 मेगावॅट
मे 2021 – 743 मेगावॅट
मे 2022 – 851 मेगावॅट
Previous Articleवाहतूक नियमभंगास आता मोठा दंड
Next Article डोंगरसोनीच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र









