पाच लाखांहून अधिक पदे रिक्त : पोलीस-टीसींची संख्या वाढविणे गरजेचे
बेळगाव : भारतीय रेल्वेमध्ये पाच लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. याचा परिणाम रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांवर होत आहे. टीसी तसेच रेल्वे पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे रेल्वेतील गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. रेल्वेमध्ये प्रवाशांची तपासणी केली जात नसल्याने आरक्षित कोचमध्येही जागा मिळेल तिथे काही प्रवासी चढत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. स्लीपर तसेच एसी कोचमध्ये आरक्षण असतानाही काही प्रवासी स्वच्छतागृहाच्या परिसरात झोपून प्रवास करतानाचे चित्र दिसत आहे. तसे पाहता तिकीट तपासणीसांनी अशा प्रवाशांना हटकून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे असते. परंतु, कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्यामुळे रेल्वेतील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.
तोतया तिकीट तपासणीसकडून गैरफायदा
त्याचा गैरफायदा घेत काही तोतया तिकीट तपासणीस नागरिकांकडून पैसे उकळत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलीस त्याचबरोबर टीसींची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. नैत्य रेल्वे विभागात टीसींची संख्या सर्वात कमी असून ती वाढविण्यासाठी नैत्य रेल्वेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
500 हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
तिकीट तपासणीसांच्या अनेक जागा रिक्त असून यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सध्या 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात असून, लवकरच तिकीट तपासणीस म्हणून त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी रेल्वेस्थानकांना भेटी देऊन तेथील माहिती जाणून घेत आहेत. प्रवाशांनी कोणत्याही समस्येसाठी 139 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.
– अनिश हेगडे (जनसंपर्क अधिकारी नैत्य रेल्वे)









