कुडचडे पोलीस स्थानकात दाखल एकूण तक्रारींची संख्या 24 वर
प्रतिनिधी/ कुडचडे
‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या काकोडा शाखेच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करून कोट्यावधींची फसवणूक केलेल्या सेनी कुलासो उर्फ तन्वी वस्त व व्यवस्थापक आनंद जाधव यांच्या विरोधातील तक्रारींत आणखी भर पडली असून एकूण 24 तक्रारी शनिवारी संध्याकाळपर्यंत दाखल झाल्या असल्याची माहिती पोलीस स्थानकातून प्राप्त झाली आहे. विविध उपनिरीक्षकांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे.
दरम्यान, सेनी कुलासो उर्फ तन्वी वस्त हिच्या खात्यात फक्त 8900 ऊपयेच असल्याचे दिसून आल्याने खातेधारकांना पायाखालची जमीन सरकल्यागत वाटले आहे. काबाडकष्ट करून जमविलेले पैसे उतारवयात आधार व्हावा म्हणून त्यांनी कायम ठेवींच्या रुपाने ठेवले होते. त्या कायम ठेवींची दिलेली प्रमाणपत्रे बनावट असून आपल्याला फसविले गेले आहे हे समजल्यानंतर त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. सध्या सर्वांची नजर पोलीस खात्यावर खिळलेली असून ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे लुटलेले पैसे परत कोण करणार असा प्रश्न विचारला जात आहे.
दिशाभूल करून ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यावर डल्ला मारलेल्या सेना कुलासो उर्फ तन्वी वस्त व बँक व्यवस्थापक आनंद जाधव यांना दि. 25 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. तेव्हापासून पोलीस कारवाई सुरू आहे. शुक्रवारपर्यंत एकूण 19 तक्रारी पोलीस स्थानकात दाखल झाल्या होत्या व त्यातील फक्त चार कायदेशीररीत्या नोंद करून घेण्यात आल्या होत्या. तसेच या फसवणूक प्रकरणातील 18 लाख 50 हजार रु. किमतीचा सोन्याचा ऐवज पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. पण या प्रकरणी डल्ला मारण्यात आलेल्या पैशांचा अजून थांगपत्ता लागत नसल्याचे चित्र उभे झाल्यामुळे लोकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आधुनिक प्रणालीचा वापर करून जरी पैसे एकट्याच्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात हलविले, तरी या सर्व गोष्टींच्या नोंदी संगणकावर सहज दिसायला हव्यात. मिळालेल्या माहितीनुसार तन्वीच्या खात्यात फक्त 8900 रु. दिसत आहेत. मग लुटलेले पैसे गेले कुठे, असा सवाल लोकांकडून करण्यात येत आहे.
एफडी’च्या नावाने घातला लाखोंचा गंडा
तन्वी वस्तने दिशाभूल करून कायम ठेवींच्या स्वरूपात ठेवण्याच्या बहाण्याने आपल्याला 5 लाख रुपयांना फसविले. त्याशिवाय 3 लाख रु. आपल्या खात्यातून गायब झाले आहेत, असा दावा काकोडा येथील स्टीव्हन्सन फर्नांडिस यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टीव्हन्सन यांनी आपल्या एक फ्लॅटची विक्री केली होती व ते पैसे सेंट्रल बँक काकोडा शाखेतील खात्यात ठेवले होते. त्यानंतर घराचे काम सुऊ असल्यामुळे पैसे काढण्यासाठी ते बँकेत आले तेव्हा तन्वी वस्त यांना बँक कर्मचारी समजून त्यांनी तिच्याशी संपर्क साधला व तिला मुलाच्या नावावर कायम ठेवी ठेवायच्या आहेत, असे सांगितले.
त्याप्रमाणे तन्वीने सोपस्कार करून सह्या व धनादेश व आपल्याला दीड लाखांच्या दोन व दोन लाखाची एक अशा प्रकारे कायम ठेवींची कागदपत्रे दिली. त्यानंतर आपण व्यस्त राहिलो व बँकेत कायम ठेवी ठेवल्याने निवांत होतो. ही घटना एप्रिल, 2023 ची आहे. त्यानंतर नुकतेच आपल्या शेजाऱ्याने आपल्याला या प्रकरणाबद्दल सांगितल्यानंतर आपण बँकेत विचारपूस करण्यास आलो असता कार्यरत असलेल्या बँक व्यवस्थापकाने जी कागदपत्रे आपल्याला देण्यात आली आहेत ती बनावट असल्याचे सांगितले. तसेच आपल्या खात्यातून तीन लाख रु. काढण्यात आले असल्याचेही समजले. यासंबंधी कुडचडे पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले.









