तीन लाखावरुन पाच लाखपर्यंतचे उत्पन्न ग्राह्या : मंत्रिमंडळाचा निर्णय , 350 जणांना होणार लाभ
पणजी : ‘अनुकंपा’ योजनेखाली नोकरी मिळविण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या 3 लाख ऊपयांच्या उत्पन्न मर्यादेमुळे अनेकांना ‘अनुकंपा’ नोकरीपासून वंचित रहावे लागत होते. याची दखल घेऊन सरकारने आता ही मर्यादा दोन लाख ऊपयांनी वाढवल्याने आता 5 लाख ऊपयेपर्यंत उत्पन्न असलेले उमेदवार अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी अर्ज करू शकणार आहेत. ही उत्पन्न वाढीची मर्यादा 1 एप्रिल 2017 पासून पूर्वानुलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. काल बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी बैठकीत झालेल्या विविध निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते.
निर्णयाचा 350 जणांना होणार लाभ
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 3 लाख ऊपये उत्पन्नाच्या मर्यादेमुळे अनेक उमेदवारांना अर्ज करता आले नाही. सरकारी नोकरीत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येते. परंतु. 3 लाखांची उत्पन्न मर्यादा अत्यल्प असल्याने अनेकांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे ही उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आली असून, याचा सुमारे 350 जणांना लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
विद्या सहाय्य योजनेस मंजुरी
राज्यातील सर्व शाळांसाठीच्या विद्या सहाय्य योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘विद्या सहाय्य योजना’ राबविण्यात येणार असून, या योजनेचा लाभ सर्व शाळा, विद्यालयांना घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विविध योजनांच्या लाभधारकांनी आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करावे
सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना ह्या जनकल्याणकारी आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ घेताना लाभधारकांनी त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. ज्या लाभधारकांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसेल त्यांना लाभ घेता येणार नाही. त्यामुळे सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या गृह आधार, लाडली लक्ष्मी, दयानंद सामाजिक सुरक्षा, आदी योजनांच्या लाभधारकांनी आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणे अनिवार्य आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
कंत्राटी पद्धतीवर बॉयलर ऑपरेटर उमेदवारांना आवश्यक त्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे. दक्षिण गोव्यातील चार ठिकाणी फॅक्टरी आणि हॉस्पिटल या ठिकाणी हे बॉयलर ऑपरेटर नियुक्त केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जागतिक टेनिस स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिपला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
सोनसड्याचा अतिरिक्त कचरा साळगावला जाणार
सोनसडा कचरा प्रकल्पातील कचऱ्यावर प्र]िक्रया करण्यासाठी साळगाव येथे दररोज 20 टन कचरा पाठवला जातो. आता आणखी 10 टन कचरा तेथे पाठविण्यात येणार असून एकूण 30 टन कचरा साळगाव येथील प्रकल्पात पाठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या कचऱ्याबाबतची भूमिका सरकारने न्यायालयातही स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.









