19 पोलीस ठाणी कक्षेबाहेर राहणार
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ‘अफ्स्पा’ची व्याप्ती वाढवण्यात आली. मणिपूरच्या डोंगराळ भागांना पुन्हा ‘अफ्स्पा’अंतर्गत ठेवण्यात आल्याचे सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. या नियमावलीतून 19 पोलीस ठाणी कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहेत.
अफ्स्पा कायदा 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले. 19 पोलीस स्टेशन वगळता मणिपूरचा संपूर्ण परिसर सहा महिन्यांसाठी अशांत क्षेत्र घोषित करण्यात आला आहे, असे सरकारने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. इंफाळ, लम्फेल, सिटी, सिंगजामेई, सेकमाई, लामसांग, पास्तोल, वांगोई, पोरोम्पत, हंगंग, लमलाई, इरिबुंग, लिमाखेंग, थौबल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरांग, काक्चीन आणि जिराबम पोलीस ठाण्यांना एएफएसपीएच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.
पुन्हा इंटरनेटवर बंदी
मणिपूरमध्ये मे महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाले आहेत. अलीकडेच राज्यात शांतता दिसून आल्यानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मणिपूरमधील तणावपूर्ण परिस्थिती पाहता इंटरनेटवर पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. सद्यस्थितीत मणिपूर सरकारने 1 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 7:45 वाजेपर्यंत राज्यातील मोबाईल इंटरनेट सेवा तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.









